Fitness Tips: आरोग्यदायी जीवनासाठी जिमसोबत पुरेशी झोपही आवश्यकच

आहार, व्यायाम व झोप या त्रिवेणी संगमाची गरज
Fitness Tips: आरोग्यदायी जीवनासाठी जिमसोबत पुरेशी झोपही आवश्यकच
Pudhari File Photo
Published on
Updated on

सोलापूर : धकाधकीच्या जीवनात शरीराचा फिटनेस महत्त्वाचा असतो. त्यासाठी जिममध्ये तासन्‌तास घाम गाळणे व अत्यंत कडक डाएट पाळणे एवढेच करणे हा चुकीचा समज अनेकांमध्ये आहे. तज्ज्ञांच्या मते, शारीरिक आरोग्य व वजन नियंत्रणासाठी झोप, आहार व व्यायाम या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यापैकी एकाकडे जरी दुर्लक्ष झाले तर शरीराचे कार्य विस्कळीत होऊ शकते.

व्यायामामुळे शरीराची जी झीज होते, ती भरून काढण्याचे व स्नायूंना बळकटी देण्याचे काम प्रामुख्याने आपण झोपेत असताना घडते. तज्ज्ञांच्या मते, अपुऱ्या झोपेमुळे शरीरातील भूक वाढवणारे हार्मोन्स सक्रिय होतात. तर पोट भरल्याची जाणीव करून देणारे हार्मोन्स कमी होतात. परिणामी, व्यक्तीला जास्त भूक लागणे व गोड पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते. अशा समस्या यामुळेच उद्भवतात.

यासोबतच अपुऱ्या झोपेमुळे इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होऊन वजन वाढण्याचा धोकाही अधिक असतो. म्हणूनच झोप महत्त्वाची आहे. मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्हीच्या स्क्रीनमधून बाहेर पडणारा निळा प्रकाश हा झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम करते. यामुळे वेळेवर झोप न येणे ही समस्या बनली आहे. प्रत्येक व्यक्तीची झोपेची गरज ही त्यांचे वय, शारीरिक हालचाल व कामाचा ताण यावर अवलंबून असते. महिलांच्या बाबतीत काही विशेष शारीरिक बदलांच्या काळात त्यांना अधिक विश्रांतीची गरज भासू शकते.

सध्याच्या डिजिटल युगातील हेच खरे आव्हान आहेत. फक्त जिममध्ये जाऊन कष्ट करण्यापेक्षा संतुलित आहार, पुरेसे पाणी आणि झोप घेणे, हेच उत्तम आरोग्यासाठी अधिक प्रभावी ठरते. त्यामुळे फिटनेसपणा मिळवण्यासाठी व्यायामासोबतच आपल्या झोपेच्या वेळा पाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

​झोपेचे महत्त्व दर्शवणारे मुख्य मुद्दे

स्नायूंच्या पुनर्बांधणीसाठी व्यायामानंतर शरीराची झीज भरून काढण्यासाठी झोप अनिवार्य.

​हार्मोनल संतुलनासाठी अपुऱ्या झोपेमुळे भूक वाढवणारे हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे वजन वाढते.

​मानसिक आरोग्यासाठी पुरेशी झोप थकवा कमी करते आणि दुसऱ्या दिवशीच्या कामासाठी ऊर्जा देते.

​​गाढ झोपेसाठी काही टिप्स

स्क्रीनपासून दूर राहा : झोपण्यापूर्वी किमान एक तास मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्हीचा वापर टाळा.

​नियम पाळा : झोपण्याची आणि उठण्याची एक निश्चित वेळ ठरवा.

​आहार आणि पाणी : रात्रीचे जेवण हलके असावे आणि दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news