

सोलापूर : यंदा गणेशोत्सव हा १० दिवसांऐवजी ११ दिवसांचा असून, बुधवार, दि. २७ ऑगस्ट रोजी भाद्रपद शु. चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेश चतुर्थी आहे. यादिवशी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४:५० ते दुपारी १:५३ पर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.
गणेशाची स्थापना करण्यासाठी भद्रादि (विष्टि) कोणतेही कुयोग वर्ज्य करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्त वेळेची आवश्यकता नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना मध्यानंतरदेखील करता येऊ शकते.
प्रातःकालापासून मध्यापर्यंत कोणत्याही वेळी स्थापना व पूजा करता येते. श्रीगणेश चतुर्थीच्या आधीही गणेश म्हणजे ८-१० दिवस आधीसुद्धा गणेश मूर्ती घरी आणून ठेवता येते. घरातील गणेशमूर्ती जास्तीत जास्त एक वीतभर उंचीची आणि आसनास्थ असावी.
उजव्या सोंडेचा गणपती कडक आणि डाव्या सोंडेचा सौम्य अशी समजूत आहे, तीदेखील चुकीचीच आहे. समर्थ रामदासांनी गणेशाचे वर्णन करताना आरतीमध्ये सरळ सोंड वक्रतुण्ड त्रिनयना असे म्हटले आहे.
काही जणांकडे दीड दिवस, ५, ७ तर काही जणांकडे अनंत चतुर्दशीपर्यंत उत्सव साजरा केला जातो. तसेच काही जणांकडे घरामध्ये गर्भवती असताना गणपती विसर्जन न करण्याची पद्धत आहे; पण ती बरोबर नाही, घरामध्ये गर्भवती स्त्री असताना गणपती विसर्जन करता येते. अशा वेळेस विसर्जन न करण्याची प्रथा चुकीची आहे.
विरघळणारी मूर्ती असावी
गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रतिष्ठापना केलेल्या पार्थिव गणेश मूर्तीचे विसर्जन होणे आवश्यक आहे आणि ते पाण्यामध्ये करावे, असे धर्मशास्त्र सांगते. वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे, असे नसून पाण्यात विसर्जन करावे असे आहे. त्यामुळे तलावात किंवा स्वतंत्र टँकमध्ये, तसेच घरी मोठ्या बादलीमधील पाण्यातसुद्धा विसर्जन करता येते. विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी. प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा तत्सम पाण्यात न विरघळणाऱ्या पदार्थांची मूर्ती नसावी.
गणेशोत्सवातील महत्त्वाचे दिवस
बुधवार, दि. २७ ऑगस्ट : श्रीगणेश चतुर्थी यादिवशी पहाटे ४:५० ते दुपारी १:५३ पर्यंत कधीही घरगुती गणेशाची स्थापना करता येईल.
रविवार, दि. ३१ ऑगस्ट : गौरी आवाहन अनुराधा नक्षत्रावर सूर्योदयापासून सायंकाळी ५.२७ पर्यंत आपल्या परंपरेप्रमाणे गौरी आवाहन करावे.
सोमवार, दि. १ सप्टेंबर : गौरी पूजन
मंगळवार, दि. २ सप्टेंबर : गौरी विसर्जन मूळ नक्षत्रावर सूर्योदयापासून रात्री ९:५१ पर्यंत गौरी विसर्जन करावे.
शनिवार, ६ सप्टेंबर: अनंत चतुर्दशी
रविवार, ७ सप्टेंबर: खग्रास चंद्रग्रहण असून, हे ग्रहण रात्री ९:५७ ते १:२७ या काळात भारतामध्ये सर्वत्र दिसणार आहे.
पुढील वर्षी ज्येष्ठ अधिकमास असल्याने श्रीगणेशाचे आगमन उशिरा होईल. सोमवार, दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी श्रीगणेश चतुर्थी असेल.
मोहन दाते,पंचांगकर्ते