झरे येथील सुस्थितीत असलेली अंगणवाडी नेस्तनाबूत केली. या प्रकरणी प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. या प्रकरणाला जवळपास तीन महिने लोटले आहेत. मात्र, संबंधितावर गुन्हा दाखल न झाल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. एवढेच नव्हे तर शासकीय मालमत्तेचं नुकसान झाल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे वरिष्ठाच्या आदेशाला केराच्या टोपलीत फेकण्यात आल्याने ग्रामस्थांनी पुन्हा स्थगित केलेले उपोषण पुन्हा १४ ऑगस्ट रोजी करण्यात येणार असल्याचा इशारा लेखी पत्राद्वारे दिला आहे.
याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे म्हटले आहे की, झरे येथील २०१३ मधील बांधलेली अंगणवाडी ची इमारत हे सुस्थितीत होती. मंजूर जागेत इमारत बांधणे आवश्यक असताना त्याची मंजुरी इतरत्र असताना ही इमारत गावातील मुलांच्या सोयीसाठी गावात उभारली होती. तरीही इमारत सुस्थितीत असतानाही गावातीलच काही लोकांनी वीस एप्रिल २४ रोजी च्या रात्री राजकीय व आर्थिक फायद्यासाठी एका रात्रीत कोणत्यातरी मशिनरीच्या सहाय्याने जमीनदोस्त केली. पडलेलं मटेरियल ही रात्रीत गायब करून टाकले. इमारत पाडणार असल्याची चर्चा गावामध्ये यापूर्वीच होती. तशी ती माहिती आपण ग्रामसेवकांना व प्रशासनाला आपण लेखी पत्राद्वारे दिली होती.
पोलिसांनीही याचे गांभीर्य न घेता साधे पत्र समजून तगादा नसल्याने कसलीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे अंगणवाडीतील बालकांना तसेच शासकीय मालमत्तेचे नुकसान करणाऱ्याला शोधण्यासाठी व इतर मागण्यासाठी पुन्हा १४ ऑगस्ट रोजी करमाळा येथील तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या आवारामध्ये आमरण उपोषण करीत असल्याचे सोमनाथ जाधव, दत्तात्रय सुरवसे आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी लेखी निवेदनाद्वारे कळवले आहे. याच्या प्रती सर्व वरिष्ठांना दिलेले असून वरिष्ठांनी करमाळा येथील पंचायत समिती व बालविकास प्रकल्प विभागाच्या बेताल कारभारावरच्या संदर्भात चौकशी करून जबाबदारी झटकणाऱ्या कर्मचारी अधिकारी व संबंधितावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.