सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथील जमीन व्यवहारात माजी महापौर मनोहर सपाटे यांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीस दंड व शिक्षा सुनावली आहे, अशी माहिती फिर्यादी माजी महापौर मनोहर सपाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोंडी येथील जमिनीवर माजी महापौर मनोहर सपाटे यांनी शरदचंद्रजी पवार अॅग्रीकल्चर कॉलेज काढण्यासाठी राहुरी कृषी विद्यापीठाकडे प्रस्ताव दाखल केलेला होता. ही जमीन यातील आरोपी गिरीश केशव कनेकर यांनी मौजे कोंडी येथील ही जमीन खरेदी देतो असे आश्वासन देऊन या जमिनीच्या खरेदीपोटी फिर्यादी सपाटे यांच्या कडून वेळोवेळी एकूण 57 लाख रुपये घेतले. कब्जा साठे खत करून दिलेले असतानाही या जमिनी फिर्यादी यांना विक्री न करता अथवा यासाठी घेतलेले 57 लाख रुपये परत न करता फिर्यादी सपाटे यांचा विश्वासघात केला आणि फसवणूक केली, असा आरोप सपाटे यांनी केला आहे.
आरोपीने फिर्यादीच्या परस्पर माहिती न देता कागदपत्रे वापरून इतरांच्या नावे जमिनीचे खरेदीखत परस्पर करून दिले. फिर्यादीची फसवणूक केली म्हणून याप्रकरणी फिर्यादीने आरोपीविरुद्ध फौजदार चावडी पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. त्याप्रमाणे दोषारोप पत्र दाखल केलेले होते. या प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडधिकारी दीप्ती कोळपकर यांनी आरोपी गिरीश कनेकर यांनादोन वर्षे शिक्षा व पाच हजार दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे वकील आनंद काळे तर आरोपीतर्फे वकील एस. पी. कदम यांनी काम पाहिले.