

Doctor absent at primary health center in Jafrabad taluka
रावसाहेब अंभोरे
टेंभुर्णीः जाफराबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेच आरोग्य आबाधित राहावे यासाठी राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. आरोग्य केंद्रासाठी भव्य दिव्य इमारतीचे बांधकाम करण्यात आल्या असतांनाच रुग्णांवर योग्य उपचार व्हावेत यासाठी आरोग्य केंद्राच्या अंतर्गत उपकेंद्र बांधून तेथे डॉक्टरांची व इतर कर्मचाऱ्यांच्या राहण्यासाठी निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. मात्र बहुसंख्य डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी बांधण्यात आलेल्या निवासस्थानात न राहता बाहेर गावाहून अपडाऊन करीत असल्याने निवासस्थाने ओस पडलेले असतानाच आरोग्य केंद्र व उपकेंद्रात डॉक्टर्ससह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गैर हजेरीमुळे तालुक्यातील पावणेदोन लाख लोकांचे आरोग्य राम भरोसे असल्याचे चित्र आहे.
जाफराबाद तालुक्यात डोणगाव, वरुड, खासगाव, कुंभारझरी, माहोरा आदी ५ प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्यांच्या अधिपत्याखाली २२ उपकेंद्र आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिपत्याखाली स्थापन झालेल्या उपकेंद्रात सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी कार्यरत असणारे कर्मचारी सतत गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी वारंवार होतात. मात्र याकडे संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना नाईलाजाने खासगी दवाखान्याकडे मोर्चा वळवावा लागत आहे. जाफराबाद तालुक्याची ओळख मागासलेला म्हणून आहे. आरोग्य विभागानेही त्यात भर टाकली असल्याचे दिसत आहे.
असे आहेत केंद्र व उपकेंद्र
खासगाव प्रथामिक आरोग्य केंद्रांतर्गत देऊळझरी, जाफराबाद, खासगाव, कुंभारी, वरखेडा, विरो माहोरा आरोग्य केंद्रांतर्गत आसई, बोरगाव, जानेफळ, जवखेडा, येवता डोणगाव केंद्रांतर्गत आकोला देव, देळेगव्हाण, डोणगाव. नादखेडा, तोडोळी, वरुड बु केंद्रांतर्गत आढा, भारज बु, सिपोरा, वरुड बु, कुंभारझरी आरोग्य केंद्रांतर्गत कुंभारझरी, आंबेगाव हिवराकाबली, कुंभारझरी हे उपकेंद्र आहेत.