

Dnyaneshwar Mauli Palkhi in Solapur District
नातेपुते: एकच चैतन्य, एकच ब्रह्म भरून राहिले आहे, हे सिद्ध करण्यासाठी ज्ञानोबांनी रेडय़ाला वेदघोष करायला सांगितलं. ‘रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांतिरूपे प्रकटला ज्ञानोबा माझा..’ या ज्ञानोबांवर सर्व संतांनी, सर्व महाराष्ट्राने खूप प्रेम केले. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा महिमा अगाद.
विटेवर उभ्या असलेल्या सावळ्या विठुरायाला केव्हा भेटेन, या उत्कट ओढीने ऊन वारा पावसाची तमा न बाळगता अलंकापुरीहून आलेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोबत लाखो वैष्णवांची मांदियाळी अखंड हरिनाम घेत झपझप पावले उचलत असून, या सोहळ्याने आज (दि. ३०) सकाळी १०. ५५ वा. सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर धर्मपुरी येथे तोफांच्या सलामीत सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. माऊली, माऊलींचा जोरदार गजराने आसमंत दुमदुमत असतानाच टाळमृदंगाचा टिपेला पोहोचलेला नाद आणि जोडीला हातातील भगवी पताका उंचावत तल्लीन नाचणाऱ्या वारकऱ्यांच्या जोशात वातावरणातील गारवा अंगावर झेलत दंग झालेला वैष्णवांचा मेळा.
सर्वात पुढे चौघडा, त्यामागे अश्व व २७ दिंड्या, त्यानंतर माऊलींच्या विविध फुलांनी सजवलेला रथ आणि त्यामागे २५० पेक्षाही अधिक दिंडयांचा दळभार टाळ, मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करती मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात धर्मपुरी येथे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर आला. रथाला तोरणे, लड्या, गोंडे आदींची सजावट करण्यात आली होती. त्यासाठी मोगरा, झेंडू यासह वेगवेगळ्या फुलांचा वापर करण्यात आला होता.
विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे विठ्ठल नामाच्या अखंड गजरात आज सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले. ध्यास हा जिवाला, पंढरीशी जावू, पंढरीचा राणा डोळे भरुन पाहू, या उक्तीचा प्रत्यय आज येत होता.
पालकमंत्री जयकुमार गोरे, सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, खा.धैर्यशिल मोहिते पाटील, आ.उत्तमराव जानकर, माजी आमदार राम सातपुते, सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजया पांगारकर, अमित माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्यासह शासन व प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. भाजपचे सोलापूर जिल्हा ओबीसी चे जिल्हा अध्यक्ष ॲड भानुदास राऊत यांनी प्रथम माऊलीच्या अश्वाचे पूजन केले. त्यानंतर माऊलींच्या पादुकाचे पूजन करुन पालखीचे स्वागत केले.
तत्पूर्वी सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील व पोलिस अधीक्षक तुषार दोशी, फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी माऊलींच्या पालखीला निरोप दिला. धर्मपुरी सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने वारकरी टोपी देऊन त्यांचा या वेळी सन्मान करण्यात आला.
पालखी आगमनापूर्वी शासनाच्या वतीने भारुडाच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम सादर करण्यात आला. शासनाच्या विविध विभागामार्फत राबविले जाणारे पर्यावरण, निर्मलवारी आणि स्वच्छता विषयक जनजागृतीचे कार्यक्रम सादर केले. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी धर्मपुरी बंगला येथे विसावा घेऊन नातेपुतेकडे जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी सायंकाळी ५ वा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आगमन झाले. यावेळी नातेपुतेच्या नगराध्यक्ष अनिता लांडगे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, नगरसेवक ॲड. भानुदास राऊत व ग्रामस्थांनी संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पादुकावर नतमस्तक होऊन दर्शन घेतले. फुलांचा वर्षाव करून स्वागत केले.
त्यानंतर पालखी सोहळासह वैष्णवांचा मेळा नातेपुते नगरीत पालखी तळावर विसावला. यावर्षी मान्सूनपूर्व चांगल्या प्रकारे पाऊस झाल्याने वारीतील वारकऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली असल्याचे चित्र दिसून येत आहे.पालखी सोहळा आगमन व दिंडी विसाव्या ठिकाणी वेळेवर मार्गस्थ करताना विणा अडथळा जाण्यासाठी अकलूज उपविभागीय पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूकचे नियोजन पोलिस प्रशासनाने चोख कामगिरी बजावली.
याप्रसंगी सहकुटुंब उपस्थित राहून माऊलींच्या पालखीचे आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रातील जनतेची भरभराट होवो, तसेच यावर्षी उत्तम पर्जन्यमान राहो, अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना केली.
- जयकुमार गोरे, पालकमंत्री