

पंढरपूर : शनिवारी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा ३० लाखांहून अधिक भाविकांच्या उपस्थितीत साजरा झाला. भाविकांची संख्या वाढल्याने आपसुकच वाहनांचीही संख्या वाढली आहे. एकादशीला येणारे भाविक आणि एकादशी साजरी करुन माघारी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांमुळे प्रत्येक रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे पायी ये-जा करणाऱ्या भाविकांना याचा खूप त्रास झाला. तसेच वाहनात बसून राहिलेल्या भाविकांना देखील वाहनात तासन्तास बसावे लागले.
आषाढी यात्रेकरिता मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तसेच वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी स्वतंत्र वाहतूक विभाग कार्यरत होता. मात्र, म्हणावे तसे कार्य वाहतूक विभागाकडून करण्यात न आल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली. याचा फार मोठा त्रास भाविकांना व शहरवासीयांना सोसावा लागला आहे.