

सोलापूर ः दैनिक ‘पुढारी’चा 88 वा वर्धापन दिन आज गुरुवारी (दि. 1 जानेवारी) आहे. यानिमित्त हेरिटेज मंगल कार्यालयाच्या लॉनवर सायंकाळी सहा वाजल्यापासून स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. नववर्षाचा पहिला दिवस आणि ‘पुढारी’चा वर्धापन दिन हे सोलापूरकरांसाठी समीकरण झाले आहे.
यानिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते, कार्यकर्ते, साहित्यिक, बुद्धिजीवी, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, महिला, तरुण-तरुणी मोठ्या संख्येने या स्नेहमेळाव्यास हजेरी लावतात. याठिकाणी विविध विषयांवर गप्पा रंगतात. सोबतीला वाफाळती कॉफी, जानेवारीतील हवाहवासा गारठा आणि स्नेहीजनांच्या गाठीभेटींमुळे हा सोहळा उत्तरोत्तर रंगत जातो.
रोखठोक, वस्तुनिष्ठ पत्रकारितेचा उत्सव
‘पुढारी’ने शहर-जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर नेहमीच रोखठोक भूमिका घेत वस्तुनिष्ठ पत्रकारिता केली आहे. यामुळे हा वर्धापनदिनाचा सोहळा म्हणजे रोखठोक,वस्तुनिष्ठ पत्रकारितेच्या गौरवाचा उत्सवच असतो. लोकप्रतिनिधींच्या कार्याला योग्य दिशा देण्याचे त्याचबरोबर प्रशासनाच्या कामावर अंकुश ठेवण्याचे काम ‘पुढारी’ने नेहमीच केले आहे.
संग्राह्य पुरवण्यांची बौद्धीक मेजवानी
वर्धापन दिनानिमित्त ‘पुढारी’कडून वाचकांना दरवर्षी अभ्यासपूर्ण, संग्राह्य पुरवण्यांची बौद्धीक मेजवानी देण्यात येत असते. त्यानुसार यंदाही ‘आत्मनिर्भर भारत’ या विषयाला वाहिलेल्या पुरवण्यांची बौद्धीक मेजवानी वाचकांसाठी असणार आहे. सोलापूरसह राज्यभरातील विविध तज्ज्ञांच्या लेखणीतून साकारलेले अक्षरधन यानिमित्ताने वाचकांच्या भेटीला आज गुरूवारपासून (दि. 1 जानेवारी) येत आहेत.