

पंढरपूर : 'पंढरीची वारी हा महाराष्ट्राचा अत्यंत पवित्र असा सांस्कृतिक ठेवा आहे. मोगलांचा वा इंग्रजांचा काळ असो, अथवा ऊन, पाऊस आणि आजारपण असो, कोणत्याही परिस्थितीत हरी नामाचा गजर करणारी वारी कधीही थांबली नाही. अशा पुरोगामी आणि भक्तिमार्गाची राजधानी असलेल्या महाराष्ट्रात वारकऱ्यांच्या सेवेसाठी जे जे आवश्यक आहे, ते सर्व करण्यास आमचे सरकार कटिबद्ध आहे,' असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ग्रामविकास विभाग आणि पंचायत राज विभागाच्या वतीने आयोजित 'आषाढी पालखी सोहळा निर्मल वारी समारोप समारंभात' मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या वारीचे चित्र पूर्णपणे बदलून टाकले आहे. त्यांनी वारीत सुविधा पुरवण्याबाबत आमूलाग्र बदल घडवून आणले. 'प्रत्येक वारकऱ्यांमध्ये माऊली आहे' याच भावनेतून त्यांनी सेवा केल्यामुळे हे मोठे परिवर्तन शक्य झाले आहे.
लाखो वारकरी आले तरी आज पंढरपूर स्वच्छ दिसत आहे. वारी पूर्ण झाल्यानंतरही पंढरपूर तेवढेच स्वच्छ दिसेल. दरवर्षी मागील वर्षापेक्षा अधिक उत्तम काम करण्याचा आमचा मानस आहे. या सोहळ्यास आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, आ. अभिजित पाटील, आ. समाधान आवताडे, आ. नारायण पाटील, आ. गोपीचंद पडळकर, आ. राजेंद्र राऊत, माजी आमदार प्रशांत परिचारक, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांचे आभार आ. समाधान आवताडे यांनी मानले.