

Group Fight Tembhurni
टेंभुर्णी : टेंभुर्णी शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, झिरपे वस्ती रस्त्यावर तरुणांच्या दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही गटांनी एकमेकांच्या वाहनांची तोडफोड केली. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होताच संशयित वाहने सोडून शेतातून पसार झाले. ही घटना बुधवारी (दि. १६) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.
याबाबत टेंभुर्णी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, झिरपे वस्ती परिसरात दोन गटांत हाणामारी सुरू असल्याची माहिती डायल ११२ वरून अजय हवालदार यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी दोन्ही गटांमध्ये जोरदार मारामारी सुरू होती. मिळेल त्या वस्तूंचा वापर करून एकमेकांना मारहाण केली जात होती. तसेच वाहनांचीही तोडफोड करण्यात येत होती.
पोलिसांचे वाहन घटनास्थळी आल्याचे लक्षात येताच दोन्ही गटांतील व्यक्ती आपापली वाहने घटनास्थळी सोडून वेगवेगळ्या दिशेने शेतातून पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळावरून काही वाहने ताब्यात घेतली.
पोलिसांना घटनास्थळी होंडा युनिकॉर्न मोटारसायकल (एमएच ४५ एडब्ल्यू ०९०९), हिरो पॅशन प्रो मोटारसायकल, विनाक्रमांकाची होंडा अॅक्टिव्हा स्कूटर आणि महिंद्रा थार (एमएच १२ ईपी ०३०३) अशी वाहने आढळून आली. या वाहनांची तोडफोड झाल्याचे समोर आले आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सागर गायकवाड, पोलीस नाईक गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल शिरसागर, लवळे, कुलकर्णी आणि चालक पोलीस हवालदार गणेश डाकवाले यांनी सहभाग घेतला.
पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित नागरिकांकडे चौकशी केली असता, हाणामारीतील व्यक्ती टेंभुर्णी येथील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पारस हवालदार, आप्पा टकळे, अजय हवालदार, अमित देशमुख, अजित देशमुख, समाधान कोल्हे, निलेश देशमुख, रितेश देशमुख, किसन देशमुख, राहुल देशमुख, समाधान देशमुख आणि प्रतीक बंडू पाटील (सर्व रा. टेंभुर्णी, ता. माढा) यांच्याविरुद्ध रीतसर फिर्याद दाखल करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास टेंभुर्णी पोलीस करीत आहेत.