सोलापूरात गुन्हेगारी रोखण्यासाठी सीसीटीव्ही

सोलापूरात गुन्हेगारी रोखण्यासाठी सीसीटीव्ही

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  'स्मार्ट सिटी' योजनेंतर्गत शहरातील प्रमुख बाजारपेठा, मुख्य चौक, रेल्वेस्थानक, एस.टी. स्टँड यासह विविध संवेदनशील भागांत सुरक्षेच्यादृष्टीने महानगरपालिकेकडून 136 सीसीटीव्ही बसवण्यात येत आहेत. या सीसीटीव्हींमुळे शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी मदत होणार आहे.

मागील काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. अनेक सोसायट्यांमध्ये चोरांनी हैदौस घातला आहे. चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. पार्किंगमधील वाहनांची तोडफोड करण्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात लहान-मोठे अपघात सतत घडत असतात. यामुळे अनेकदा वादाचे प्रसंगदेखील घडतात. परंतु अशावेळी नेमकी चूक कोणाची होती याचा शोध घेणे पोलिसांना जिकिरीचे होते. दिवसाढवळ्या महाविद्यालय परिसरात मुलींना छेडणे, दोन गटांत हाणामारी करणे अशा प्रकारांमुळे रोज शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यात तक्रारी येत असतात.

शहरातील मिरवणुका, विविध राजकीय नेतेमंडळींचे दौरे यामुळे बंदोबस्तात व्यस्त असलेल्या पोलिस प्रशासनाला या लहान-मोठ्या तक्रारींकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांना अनेक वेळा पोलिस ठाण्यात हेलपाटे मारावे लागतात. दुसरीकडे तपासच्यादृष्टीने पुरावे गोळा करण्यासाठी पोलिस संबंधित परिसरातील खासगी आस्थापनांतील सीसीटीव्हींची मदत घेऊन गुन्हेगारांचा शोध घेताना दिसून येतात. परंतु अनेक ठिकाणी सीसीटीव्ही नसल्याने गुन्ह्याचा तपास करताना विलंब होतो. परंतु महानगरपलिका हद्दीत 'स्मार्ट सिटी' योजनेंतर्गत शहरातील विविध ठिकाणी 136 सीसीटीव्ही बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे शहरातील गुन्हेगारीला आळा बसेल आणि गुन्ह्यांचा तपास करण्यास पोलिस प्रशासनाला मदत होईल.

सीसीटीव्ही बसवण्याचे पोलिसांचे आवाहन

बँका, एटीएम सेंटर, पतसंस्था, मॉल, दुकाने, सोसायट्या याठिकाणी सीसीटीव्ही असणे गरजेचे आहे. अशाठिकाणी गुन्हा घडला, तर सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांना पकडणे पोलिसांना शक्य होत आहे. त्यामुळे शहरात ज्या सोसायट्यांमध्ये सीसीटीव्ही बसवले नसतील त्यांनी लवकरात लवकर बसवून घ्यावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून अनेकदा करण्यात येत असते. परंतु सीसीटीव्ही बसविण्याची वारंवार चर्चा होत असली तरी त्याची अंमलबजावणी काही मोजक्याच ठिकाणी झालेली दिसत आहे.

याठिकाणी सीसीटीव्ही बसवणार

शहरातील सोसायट्या, उद्याने, मॉल, हॉटेल, रुग्णालये, बँका, पतसंस्था, शाळा, महाविद्यालये, प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे, वाहन पार्किंग, सोन्या-चांदीसह इतर दुकानांमध्ये यासह संवेदनशील परिसर, अंधशाळा, विठ्ठल मंदिर, मोठी मशीद, सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news