Catering Rate Hike: आता केटरिंगही महागले, २० टक्के दरवाढ

महागाई आणि एफडीए परवाना नियमांमुळे केटरर्सकडून दरवाढीचे संकेत
Catering
Catering
Published on
Updated on
गौसपाक पटेल

सोलापूर : महागाईच्या वाढत्या झळा आणि अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) लागू केलेल्या कडक नियमांमुळे केटरिंग व्यवसायाचा खर्च वाढला आहे. त्यामुळे केटरर्सकडून दरात सुमारे २० टक्के वाढ करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. परिणामी, साध्या जेवणाच्या २२० रुपये प्रतिप्लेट असलेल्या दरात ४० ते ४५ रुपयांची वाढ होऊन प्लेटचा दर २६० रुपयांवर जाणार आहे.

कार्यक्रमाच्या सात दिवस आधी अन्न व औषध प्रशासनाला ऑनलाईन माहिती देणे, विविध चाचण्या, कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र यांसह अन्य नियमांचे पालन करावे लागत आहे. यामुळे केटरर्सचा तांत्रिक आणि प्रशासकीय खर्च वाढला आहे. त्यात गॅस, खाद्यतेल, डाळी, दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या दरवाढीबरोबरच कामगारांचे वेतन आणि वाहतूक खर्चही वाढला आहे.

या सर्व वाढत्या खर्चाचा परिणाम लग्नसमारंभ, सण-उत्सव आणि अन्य कार्यक्रमांच्या बजेटवर होणार आहे. केटरिंग व्यावसायिकांच्या मते, अन्नाची गुणवत्ता आणि सुरक्षितता महत्त्वाची असली तरी नियमांची अंमलबजावणी करताना वाढणारा अतिरिक्त खर्च वाढला आहे. त्यामुळे आगामी काळात जेवणावळी महागण्याची शक्यता आहे. नोेव्‍हें‍बरपासून ही दरवाढ होणार असल्याचे केटरर्स संघटनेकडून सांगण्यात आले.

एक जेवणाची प्लेट २२० वरून २६० रु. वर

केटरर्सकडून १०० ताटांसाठी २२० रुपयांप्रमाणे दर आकारले जात होते. आता ते दर २६० वर जाणार आहेत. याचा अर्थ १ हजार ताटांसाठी कार्यक्रम करणाऱ्या परिवाराला ४० हजार रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. सामान्यतः दर हजारी प्लेटनुसार केटरिंग दर कमी अधिक होतात.

गॅस, तेल, डाळी, दूध, कामगारांचे वेतन आणि वाहतूक खर्चात झालेली वाढ तसेच एफडीएच्या नियमांमुळे वाढलेला खर्च पाहता सध्याचे दर कायम ठेवणे कठीण आहे. यामुळे केटरिंग व्यावसायिकांना २० टक्क्यांपर्यंत दरवाढ करावी लागणार आहे.
- भीमा गायकवाड, उपाध्यक्ष, केटरर्स असोसिएशन सोलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news