

सोलापूर : सोलापुरातून रक्ताची, तसेच प्लाझ्माची तस्करी होत असल्याचे वृत्त दैनिक ‘पुढारी’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. मानवतेला काळिमा फासणार्या या कृष्णकृत्याची दखल अन्न व औषध निर्माणमंत्री नरहरी झिरवळ यांनी दखल घेतली आहे. याविषयी सविस्तर माहिती घेऊन योग्य कारवाई करू. यातील दोषींना कठोर कारवाईला सामोरे जावेच लागेल, असेही मंत्री झिरवळ ‘पुढारी’च्या प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले.
दरम्यान, सोलापूरचे प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांच्या आदेशानंतर शुक्रवारपासून शहर, जिल्ह्यातील 19 रक्तपेढ्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक दिवशी एक रक्तपेढी तपासण्यात येणार आहे. याविषयी प्रभारी जिल्हाधिकारी जंगम यांनी आरोग्य विभागाची बैठक घेतली. या गैरप्रकाराबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली. तपासणीसंदर्भात सर्व रक्तपेढ्यांना तारखा देण्यात आल्या आहेत. एका दिवशी एक रक्तपेढी तपासण्यात येत असल्याची माहिती तपासणी पथकाच्या सूत्रांनी दिली.
‘पुढारी’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे सेंट्रलाईज्ड ब्लड सेंटर असोसिएशने पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. सोलापुरातील रक्तपेढ्या नियम आणि अटींचे पालन करतात. रक्तदान शिबिरे भरविणारे रक्तदात्यांना गिफ्ट देत असतात. शासकीय नियमानुसार 583 ग्रॅमपर्यंत रक्त घेतले जाते. रक्त देताना रुग्णांच्या नातेवाईकांकडून कोणतेही जादा शुल्क आकारले जात नाही, प्लाझ्मा नाममात्र दरात देण्यात येतो. बेकायदेशीरपणे काम करणार्या रक्तपेढ्यांवर शासनाने कठोर कारवाई केली असल्याचे पदाधिकार्यांनी सांगितले. यावेळी अध्यक्ष संजय शिंदे, सोमेश यावलकर, वैभव राऊत, वैभव कव्हेकर, योगेश कव्हेकर, शंशांक शेरला उपस्थित होते.
‘पुढारी’ने सोलापुरातील काही रक्तपेढ्यांच्या कृष्णकृत्यांची प्रसिद्ध केलेली बातमी आम्ही गांभीर्याने घेतली आहे. आगामी काळात ब्लड बँकांनी सुधारणा करण्याची गरज आहे. शासनाचे नियम व अटींची पूर्तता करणे, नव्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यानुसार आम्ही निश्चितच सुधारणा करू.
डॉ. जीवन सगरे, अध्यक्ष, महा ब्लड सेंटर, असोसिएशन