राष्ट्रवादीला घेऊन भाजप वाढविणार सोलापूर शहर-ग्रामीण भागात दबदबा
सोलापूर; जाकिरहुसेन पिरजादे : राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनी आपल्या 35 आमदारांचे समर्थन घेऊन सत्तेत सहभागी झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील अजित पवार समर्थकांना बळ मिळणार आहे. राष्ट्रवादीला बरोबर घेतल्याने भाजपचा सोलापूर शहरबरोबरच ग्रामीण भागात दबदबा वाढणार आहे. ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात येणार आहेत.
एकेकाळी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख होती. विशेषतःग्रामीण भागातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका आणि मोहोळ, करमाळा, माढा तालुक्यात, उत्तर सोलापूर तालुक्यात राष्ट्रवादीचा दबदबा अद्यापही कायम आहे. मात्र अजित पवारांच्या बंडामुळे शरद पवार आणि अजित पवारांच्या समर्थकांतही फूट पडण्याची शक्यता आहे. याचा परिणाम आगामी निवडणुकांवर होऊ शकतो. राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार यांना जुने नेते अधिक मानतात तर अजित पवारांना मानणारा तरूणवर्ग आहे. अजितदादांचा स्वभाव जरी फटकळ असला तरी त्यांना मानणारा वर्ग सोलापुरातही अधिक आहे. मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी अजितदादांना पाठिंबा दिला, तर आमदार बबनदादा शिंदे यांनी दोन्हीकडे असल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे पवारांच्या बंडामुळे अजित पवार समर्थकांना बळ मिळणार आहे.
भाजपसोबत गेल्यामुळे विकास निधीही लवकर मिळणार आहे. येणार्या सर्वच निवडणुकीतही भाजपसोबत असल्यामुळे नक्कीच राष्ट्रवादीच्या अजितदादा गटास फायदा होणार एवढं मात्र निश्चित. आता भाजप राष्ट्रवादीला सोबत घेऊन सोलापूर शहराबरोबरच ग्रामीण भागही भाजपमय करणार असल्याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.