श्रीपूर: पुढारी वृत्तसेवा : धरण क्षेत्रात गेल्या १५-२० दिवसांपासून पावसाने थैमान घातल्याने माळशिरस तालुक्यातून वाहणाऱ्या भीमा आणि नीरा या दोन्ही नद्यांना पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मिरे - करोळे, नेवरे, वाफेगाव, जांभूड, पट कुरोली या गावातील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या पुरामुळे नदी काठाच्या शेतात नदीचे पाणी जाण्यास सुरुवात झालेली आहे. तर नदी काठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. (Bhima River Flood)
माळशिरस तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली नसली तरी, भीमा व नीरा खोर्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने वीर धरणातून नीरा नदीत व उजनी धरणातून भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. उजनी धरणाच्या सांडव्यातून तसेच वीर धरणातून सोमवारी 33 हजार 708 क्युसेकचा विसर्ग नीरा नदीत होत आहे. हे पाणी नीरा - नरसिंगपूर, संगम येथून भीमा नदीत मिसळत असल्याने भीमा नदीने रूद्र रूप धारण केले आहे. यामुळे नदीकाठच्या गावात पाणी शिरण्यास सुरूवात झालेली आहे. माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यातील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या पुराच्या पाण्यामुळे नदी काठची ऊस, केळी, मका, भुईमूग, आदी पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. (Bhima River Flood)
मंगळवारी दुपारी उजनीत एकूण पाणीसाठा १२१. ६८ टीएमसी त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा ५८.०२ टीएमसी झाला होता. तर धरण टक्केवारी १०८.३१ टक्के एवढी झाली होती. उजनीत दौंड येथून येणाऱ्या विसर्गात घट झाली. काल दुपारी दौंडचा विसर्ग ६९ हजार ७९० क्युसेक इतका होता. दरम्यान उजनीमधून सोमवारी (दि. ५) सायंकाळी भीमा नदीत सोडलेल्या १ लाख २५ हजार क्युसेक विसर्गात आज (दि. ६) घट करण्यात आली असून दुपारी ३ वाजता उजनीतून भीमेत सोडलेला विसर्ग १ लाख क्युसेक करण्यात आला. आज दुपारी नीरा नरसिंहपूर संगम येथील विसर्ग १ लाक ५८ हजार ४४२ क्युसेकवर तर पंढरपूर येथील विसर्ग १ लाख ३४ हजार १४ क्युसेक एवढा होता. (Bhima River Flood)
दरम्यान, नीरा खोऱ्यात पावसाचा जोर ओसरल्याने खोऱ्यातील धरणात येणारी पाण्याची आवक कमी होत असून प्रीआमी नीरा खोऱ्यातील वीर धरण सांडव्यातून सोडण्यात येत असलेल्या विसर्गात घट करण्यात येत असून मंगळवार ६ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता तो पूर्णतः बंद करण्यात आला. (Bhima River Flood)
भीमा नदीवरील नेवरे - नांदोरे, करकंब या गावांना जोडणारा पूलावर मंगळवारी सकाळी पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली. करोळे ते मिरे बंधा-यावरील रस्ता बंद, आव्हे ते जांभुड बंधा-यावरून पाणी वाहत असल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे. नदी काठावरील गावे, वस्त्या, संवेदनशील व पूरबाधीत होणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धोक्याच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. कोणतीही अडचण आल्यास महसूल अथवा पोलीस प्रशासनास संपर्क साधावा. संयम ठेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Bhima River Flood)