

उत्तर सोलापूर : अवघ्या एकाच दिवसात नियोजन करून तीन हजार लोकांचा जनसमुहाय जमवून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीरामकाका साठे, वडाळा गावचे सरपंच जितेंद्र साठे, जयदीप साठे या साठे पिता-पुत्र नातवासह तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते घड्याळाचे उपरणे परिधान करून गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.
वडाळा येथील विठ्ठल मंगल कार्यालयात बळीरामकाका साठे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचा खास कार्यक्रम आयोजित केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार, काका साठे, आमदार राजू खरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वर्षा शिंदे, सरपंच जितेंद्र साठे, प्राचार्या डॉ. वैशाली साठे, उपसरपंच अनिल माळी, जयदीप साठे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा सुवर्णा झाडे, उज्वला थिटे, मनोज साठे, प्रल्हाद काशीद, जितेंद्र शिलवंत, शशिकांत मार्तंडे, नागेश पवार, शरद माने, प्रकाश चोरेकर, भाऊ लामकाने यावेळी उपस्थित होते.
अजित पवार पुढे म्हणाले, सत्ता ही उपभोगण्यासाठी नाही तर जनता जनार्धनाच्या सेवेसाठी आहे, काका साठे यांनी सत्तेची भाकरी कधीच करपू दिली नाही. साठ वर्षे पवारांवर त्यांनी निष्ठा जपली. महिला आरक्षण असो व विकास आम्ही पवार साहेबांची परंपरा पुढे चालू ठेवली आहे. सोलापूर जिल्हा बँकेची स्थिती कोणामुळे झाली, ही बाब दुर्देवी आहे. पुणे जिल्हा बँकेत 35 वर्षांपासून आमची सत्ता असून राज्यात पहिला, दुसऱ्या क्रमांकावर आम्ही असतो.
आ. खरे म्हणाले, चार हजार कोटी रुपये विकास कामासाठी देऊनही त्यांची भूक भागली नाही. आता आठ हजार कोटी रुपयांच्या लालसेने त्यांनी तुमची साथ सोडली आहे. मी तुमच्या सोबत आहे. आगे आगे देखो क्या होता है. काका साठे म्हणाले, राष्ट्रवादीच्या विभाजनाच्या मला अजित पवारांनी बोलाविले होते. पण मला शरद पवारांना सोडायचे नव्हते. त्यांच्या परस्पर पक्षात काहीही चालले आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मला अजित पवारंसोबत जावे लागले.
जिल्हाध्यक्ष उमेश पाटील म्हणाले, गेली साठ वर्षांपासून पवारांवर निष्ठा ठेवून विकासासाठी राजकारण केलेल्या काका साठे यांनी पवार कुटुंबाच्या विचाराशी फारकत घ्यायची नाही, या भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. जयदीप साठे यांनी प्रास्तविक केले. दत्ता मोकाशी यांनी सूत्रसंचालन केले.