

Ashadhi Wari 2025
अकलूज : लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात मंगळवारी अकलूजमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा नेत्रदीपक रिंगण सोहळा पार पडला. या रिंगण सोहळ्यात सहभागी झालेली आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरूसुद्धा विठुरायाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाली होती. यावेळी वारकरी महिलांसोबत फुगडी खेळण्याचा मोह आर्चीलाही आवरता आला नाही. तिने मोहिते-पाटील कुटुंबासोबतही फुगडी खेळली.
'चालला गजर, जाहलो अधीर, लागली नजर कळसाला, पंचप्राण हे तल्लीन, आता पाहीन पांडुरंगाला...' लाखो वैष्णवांच्या मांदियाळीने विठुनामाचा जयघोष करीत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने मंगळवारी सकाळी ८.४५ वाजता नीरा नदी ओलांडून सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केला. पालखीचा दि. ३० जूनचा सराटी (जि. पुणे) येथे शेवटचा मुक्काम होता. प्रवेशापूर्वी पालखीतील तुकोबांच्या पादुकांना नीरा नदी पात्रात शाही स्नान घालण्यात आले. सकाळी ९.५० वाजता पालखी सोहळ्याचे अकलूज हद्दीत आगमन झाले. यावेळी अकलूजकरांच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, नंदिनीदेवी मोहिते-पाटील, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील, माजी सरपंच शिवतेसिंह मोहिते-पाटील, अकलूज नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी स्वागत केले.