

करमाळा : व्यवसायात यश मिळवून देतो, तुझा मणक्याचा त्रास कमी करतो असे सांगून धनकवडीतील (पुणे) व्यापाऱ्यास भोंदू मनोहरमामा आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारे यांनी 1लाख 21 हजारांना फसविले. याप्रकरणी दोघांवर करमाळ्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दलाराम शंकरराम सुतार यांनी फिर्यादीत म्हटले आहे, की व्यवसायात यश येत नसल्याने व मणक्याचा त्रास असल्याने 2020 मध्ये भोंदू मनोहर भोसले आणि विशाल वाघमारे यांनी सुरुवातीस पाच हजार रुपये व नंतर 50 हजार रुपये घेऊन हळदीसारखी पावडर भंडारा म्हणून दिली. त्यानंतर मनोहरमामाने 1 लाख 21 हजार रुपये घेऊन हडपसर येथील आकाशवाणी केंद्रासमोर गळ्यात एक धागा बांधून एक पुडी दिली. पुडीतील साहित्य पाण्यात टाकून पिण्यास सांगितले होते; परंतु हा उपाय करून फरक पडला नाही. त्यामुळे मनोहर भोसले आणि विशाल वाघमारे यांनी तंत्रमंत्राच्या नावाखाली फसवणूक केल्याची व्यापारी सुतार यांची खात्री झाली.
त्यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी मनोहर भोसले व विशाल वाघमारे यांच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट, आघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 2013(3) नुसार गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर दळवी या घटनेचा पुढील तपास करत आहेत.