

अक्कलकोट : सरत्या वर्षाला निरोप व नूतन वर्षाचे स्वागत तसेच संकल्प करण्यासाठी स्वामीनगरी भक्तांच्या गर्दीने फुलून गेली आहे. दि. 31 डिसेंबर रोजी रात्री कोल्हापूर व मुंबई येथील स्वामीभक्तांच्या वतीने गोड प्रसादाचे पदार्थ वाटप करुन व फटाक्यांची आतषबाजी करुन नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
पाश्चिमात्य संस्कृतीच्या चालीरितींना फाटा देत कोल्हापूर, मुंबई व राज्यातील विविध भागातील स्वामीभक्तांनी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात विविध धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली. बुधवार, दि.31 डिसेंबर रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 7 यावेळेत ओम स्वामी चैतन्य भजनी मंडळ यांचे भजन व विविधरुपी सोंगी, भारूड आदी कार्यक्रम झाले. रात्री 7:45 वाजता महाराजांची शेजारती झाली. रात्री 10 ते पहाटे 4 यावेळेत कोल्हापूर, मुंबई, पुणे येथील भजनी मंडळाचे नवीन वर्षाच्या स्वागताचे भजन व भावभक्तीगीतांचा कार्यक्रम देवस्थान परिसरात झाला.