सोलापूर : अजित पवारांच्या मातोश्रीचे विठ्ठलास साकडे अन् एकनाथ शिंदेंच्या पत्नीचा स्वामी समर्थांना धावा

सोलापूर : अजित पवारांच्या मातोश्रीचे विठ्ठलास साकडे अन् एकनाथ शिंदेंच्या पत्नीचा स्वामी समर्थांना धावा

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा ; राष्ट्रवादीत मोठी फूट पडून अजित पवार गट भाजपसोबत सत्तेत सहभागी झाला आणि ते स्वतः उपमुख्यमंत्री झाले. तर दुसरीकडे या नाट्यमय अविश्वसनीय घडामोडींमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भवितव्य अडचणीत असल्याचे मानले जाते. याच पार्श्वमूमीवर एकीकडे समाधान तर दुसरीकडे चिंतेची छाया असतानाच अजित पवार यांच्या मातोश्रींनी पंढरपुरात येऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या अर्धांगिनीने अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दरबारात नतमस्तक होऊन आपल्या पतिराजावरील संभाव्य संकट दूर होण्यासाठी धावा केला.

अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी पंढरपुरात येऊन विठ्ठल मंदिरात समाधानी चित्ताने दर्शन घेतले. पूजाविधी करून पुत्र अजित यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी विठ्ठलचरणी साकडे घातले. आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामतीत आला असताना पवार कुटुंबीयांनी वारक-यांची सेवा केली होती. तद्पश्चात, योगायोगाने आषाढी एकादशी झाल्यानंतर लगेचच अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. आमची सेवा फळाला आली. विठ्ठलाने कृपा केली, अशा शब्दात आशाताई पवार यांनी विठ्ठलाच्या दरबारात कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.

दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लताताई यांनी विमानाने सोलापुरात आल्या आणि अक्कलकोटमध्ये वटवृक्ष श्री स्वामी महाराज देवस्थानात गेल्या. आपल्या पतीवर भविष्यात कोणतेही संकट येऊ नये म्हणून लताताईंनी श्री स्वामी समर्थ महाराजांसमोर पदर पसरून धावा केला. यावेळी स्वामी समर्थ देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे व सचिव आत्माराम घाटगे यांनी लताताई शिंदे यांचा सन्मान केला. तर पुजा-यांनी 'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे ' हे श्री स्वामी महाराजांचे प्रसिध्द वचन उध्दृत केले. लताताई यांच्या सोबत शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे व मनीष काळजे होते.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news