धुळे: मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्यावेळी ठाकरे गट, टोकरी कोळी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन | पुढारी

धुळे: मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्यावेळी ठाकरे गट, टोकरी कोळी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

धुळे, पुढारी वृत्तसेवा: धुळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज (दि.१०) शिवसेनेच्या ठाकरे गटाने तसेच टोकरे कोळी आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. मात्र, पावसामुळे मुख्यमंत्री यांचा कार्यक्रमस्थळी जाण्याचा मार्ग बदलल्याने आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर मुख्यमंत्र्यांचा ताफा पुढे गेल्यानंतर आदिवासी टोकरे कोळी समाजातील तरुणांनी आंदोलन केल्याने मोठा अनर्थ टळला.

धुळ्यात आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा असल्यामुळे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुरुवातीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे धुळे तालुक्यातील गोंदूर येथील विमानतळावर त्यांचे आगमन होईल. यानंतर ते गोंदूर रोडने दत्त मंदिर चौक आणि त्यानंतर जुना आग्रा रोडने महानगरपालिका मार्गे साक्री रोडने शितल कॉलनीतील बगीच्याकडे मंत्री व्दयी यांचा ताफा जाणार असल्याचे नियोजन होते. मात्र, मुंबई येथे मुख्यमंत्री यांची बैठक लांबल्याने मुख्यमंत्री हे उशिराने मुंबई येथून धुळे येथे आले. मात्र वातावरणात बदल झाल्याने पावसामुळे धुळे येथे विमान उतरणे शक्य झाले नाही. त्यामुळे विमान जळगाव येथे नेण्यात आले. तेथून मोटारीने ते धुळ्यात परतले. मात्र, ही माहिती शिवसैनिकांना नसल्यामुळे त्यांनी दत्त मंदिर चौकात एक वाजेच्या सुमारास आंदोलन सुरू केले.

यावेळी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, डॉ.सुशील महाजन सह संपर्कप्रमुख हिलाल माळी, किरण जोंधळे, ललित माळी, भरत मोरे ,धीरज पाटील तसेच महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता. यावेळी दत्त मंदिर चौकात रास्ता रोको करण्यात आला. तसेच राज्यातील युती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या धुळे महानगरपालिका मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया यावेळी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांनी व्यक्त केली. ही माहिती पोलिसांना कळल्याने त्यांनी तातडीने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची धडपकड केली.

दरम्यान, मुख्यमंत्री उशिराने शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आटोपून आमदार मंजुळाताई गावित यांनी तयार केलेल्या बागेचे उद्घाटन करण्यासाठी पोलीस बंदोबस्तात निघाले. त्यांचा ताफा साक्री रोडवरून जाणार असल्याची माहिती आदिवासी कोळी समाजाच्या कार्यकर्त्यांना कळाली. त्यामुळे ते आंदोलन करण्यासाठी दबा धरून बसले. याचवेळी मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा पोलीस बंदोबस्तात आंदोलन करणाऱ्या कार्यकर्ते दबा धरून बसलेल्या ठिकाणापासून वेगाने पुढे निघून गेले. त्यामुळे या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री यांच्या गाडीसमोर आंदोलन करता आले नाही. पण ताफा पुढे निघून गेल्यानंतर या कार्यकर्त्यांनी उर्वरित गाड्यांना काळे झेंडे दाखवून आपला रोष व्यक्त केला. आदिवासी टोकरी कोळी समाजाच्या कार्यकर्त्यांना तरुणांना जातीचा दाखला मिळावा, यासाठी आंदोलन केल्याची घोषणाबाजी करण्यात आली.

हेही वाचा 

Back to top button