youth from Barshi ended his life
youth from Barshi ended his life

लेकरांची काळजी घे…! मराठा आरक्षणासाठी तरूणाने संपवले जीवन

बार्शी : पुढारी वृत्‍तसेवा  मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू द्या, असे म्हणून ओबीसी नेत्यांची नावे चिठ्ठीत लिहून त्यांना विनंती करत बार्शीतील एका तरूणाने पुण्यात जीवन संपवल्‍याची घटना समोर आली आहे. प्रसाद देठे (वय 38) असे पुण्यात जीवन संपवलेल्‍या तरूणाचे नाव आहे. देठे या तरूणावर त्यांच्या इच्छेनुसार तुळापूर (पुणे) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

या विषयी अधिक माहिती अशी की, देठे हा तरूण पुण्यातील वाघोली भागातील एका खासगी कंपनीत 18 वर्षापासून काम करूण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होता. त्‍याने जीवन संपवल्‍याचा प्रकार आज सकाळी समोर आला. ही बातमी बार्शी शहरात पसरताच मित्रपरिवारात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

प्रसाद देठे या तरूणाने मराठा आरक्षणासाठी चिठ्ठी लिहून गळफास घेत मराठा आरक्षणासाठी आपला जीवनप्रवास संपवला. देठे यांच्या जाण्याने तुळापूर, पुणे व बार्शीतील सामाजिक क्षेत्रात दुखः व्यक्त व्यक्‍त करण्यात येत आहे. तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाचे सेवेकरी म्हणून देठे यानी भरीव कामगिरी केली आहे. लिहिलेल्या चिठ्ठीत फक्त मराठा आरक्षण मिळावे यासाठीच आपण जीवन संपवत असल्‍याचे म्‍हटले आहे. माझ्या या जीवन संपवण्याला कोणीही जबाबदार नाही असा उल्लेखही केलेला आहे.

देठे हे मराठा आरक्षणाबाबत खूपच भावनिक झाले होते. ओबीसी नेत्यांनो मराठा समाजातील तरूणाची स्थिती खुपच विदारक आहे, त्यांनाही सन्मानाने जगु द्या, मराठा समाजाच्या ओबीसी मधील आरक्षणाला विरोध करू नका अशी विनंती ते सतत करत होते.

जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका,अशी विनंतीही चिठ्ठीत केली आहे. माझं तुम्हाला पटणार नाही, पण मी पुर्ण हताश झोलोय. चिऊ मला माफ कर, लेकरांची काळजी घे, धीट रहा, मला माफ कर, हात थरथरतोय म्हणून अक्षर असे आले आहे अशी भावनिक सादही देठे या तरूणाने चिठ्ठीत दिली आहे.

देठे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.


दहावी शिक्षण घेऊन देठे हे 18 वर्षापुर्वी पुण्यात गेले होते. देठे हे आठ दिवसापूर्वी 11 जून रोजी सहकुटुंब बार्शीत आले होते. बार्शीत आल्यावर त्यांनी नव्याने तयार झालेल्या बार्शीतील शिवसृष्टीला सहकुंटुंब भेट देऊन पाहणी करूण शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले होते. तुळजापूर,गाणगापूर,येरमाळा,अक्कलकोट येथेही सहकुटुंब जाऊन देव दर्शनही घेतले होते.

हेही वाचा : 

logo
Pudhari News
pudhari.news