सोलापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयामुळे वाहनधारकांची सोय

सोलापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयामुळे वाहनधारकांची सोय

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : वाढती वाहन संख्या लक्षात घेऊन सरकारने राज्यातील नऊ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या दर्जामध्ये वाढ करत या कार्यालयांचे रुपांतर प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये करण्यास मान्यता दिली आहे. दर्जावाढ केलेल्या नऊ कार्यालयांमध्ये सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील वाहनधारकांची सोय झाली आहे.

सोलापुरात प्रादेशिक परिवहन कार्यालय होत असल्याने पूर्ण अधिकारांनीच या ठिकाणी कामकाज होणार आहे. यापुढे पुणे कार्यालयावर अवलंबून राहावे लागणार नाही. आरटीओच्या बहुतांश सेवा ऑनलाईन झाल्याने आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज भासत नाही. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांच्या सुधारित आकृतीबंधास सरकारने यापूर्वीच मान्यता दिली आहे. त्यामध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी संवर्गातील नवीन नियमित पदे मंजूर केली आहेत. हीच बाब लक्षात घेऊन राज्यातील काही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचा दर्जा वाढवून त्यांना प्रादेशिक परिवहन घोषित केले आहे. कार्यालयामध्ये रुपांतर करण्याची बाब सरकारच्या विचाराधीन होती.

गृह विभागाने याबाबत शुक्रवारी निर्णय जारी केला. याद्वारे पिंपरी- चिंचवड, जळगाव, सोलापूर, बोरीवली, वसईसह एकूण नऊ उपप्रादेशिक कार्यालयांच्या दर्जामध्ये वाढ करत या कार्यालयांचे रुपांतर प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये करण्यास मान्यता दिली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय झाले आहे. या कार्यालयांतर्गत नांदणी हा सीमा तपासणी नाका आहे.

सोलापूर अंतर्गत अकलूज कार्यालय

सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अंतर्गत अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालय असणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयांचे कार्यालयप्रमुख म्हणून संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी असतील, असे सरकारने घोषित केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news