भीमेत बुडालेल्या ६ जणांच्या मृत्यूची भीती; थांगपत्ता लागेना | पुढारी

भीमेत बुडालेल्या ६ जणांच्या मृत्यूची भीती; थांगपत्ता लागेना

चिखलठाण; पुढारी वृत्तसेवा : भीमा नदीपात्रात मंगळवारी वादळी वार्‍यामुळे बोट बुडाली होती. त्यामध्ये सहाजण बेपत्ता झाले आहेत. त्यापैकी कुणाचाही अद्याप शोध लागलेला नाही. त्यांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तविण्यात येत आहे. शोधकार्यासाठी ‘एनडीआरएफ’च्या दोन बोटी, एक पाणबुडी कार्यरत आहे.

भीमा नदीपात्रात (उजनी धरण) कुगाव (ता. करमाळा) ते कळाशी (ता. इंदापूर) यादरम्यान बोट बुडाली होती. यामध्ये झरे (ता. करमाळा) येथील पती-पत्नी, त्यांची दोन लहान मुले व कुगाव येथील दोघे, असे सहाजण बुडाले आहेत. बोटीतील एकजण कळाशीकडे पोहत आल्याने बचावला आहे. गोकुळ दत्तात्रय जाधव (वय 30), कोमल गोकुळ जाधव (25), माही गोकुळ जाधव (3), शुभम गोकुळ जाधव (वय दीड वर्ष, रा. झरे, ता. करमाळा) व कुगाव येथील अनुराग ज्ञानदेव अवघडे (35), गौरव धनंजय डोंगरे (16) अशी बुडालेल्यांची नावे आहेत.
एक खासगी पाणबुडी, त्याचबरोबर तीन खासगी बोटी याशिवाय फपरिसरातील मच्छीमार्‍यांच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू आहे. बुडालेल्यांमध्ये अनुराग अवघडे हा बोट चालक, तर प्रवाशांमध्ये गौरव डोंगरे व राहुल डोंगरे हे दोघे सख्खे चुलतभाऊ आहेत. यात राहुल पोहत काठावर आले होते. गौरव डोंगरे हा आदिनाथ साखर कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे यांचा मुलगा आहे, तर झरे येथील एकाच कुटुंबातील चारजण बेपत्ता झाले आहेत.

भीमा नदीच्या पात्रामध्ये कुगाव (ता. करमाळा) येथून इंदापूर तालुक्यातील कळाशी या गावाकडे दररोज प्रवासी वाहतूक केली जाते. दिवसातून ही बोट साधारणत: दहा ते पंधरा फेर्‍या मारते. मात्र, मंगळवारी (दि. 21) सायंकाळी ही दुर्घटना घडली. बोट नदीपात्रामध्ये गेल्यावर अचानक जोरदार वादळी वार्‍याने उलटली.

Back to top button