विजयसिंह मोहिते-पाटील यांचा प्रवेश राष्ट्रवादीच्या फायद्याचाच : शरद पवार | पुढारी

विजयसिंह मोहिते-पाटील यांचा प्रवेश राष्ट्रवादीच्या फायद्याचाच : शरद पवार

अकलूज; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदीय लोकशाही उद्ध्वस्त करून एका हुकूमशाही रस्त्यावर जायला निघालेले आहेत. त्यांच्यात आणि रशियाचे नेते पुतिन यांच्यात साम्य आहे , असा टोला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. मोहिते- पाटील यांच्यामुळे आमच्या पक्षाला बळ मिळेल. परिणामी, महाराष्ट्राचे चित्र बदलत असल्याचे हे संकेत आहेत असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

रविवारी अकलूज येथे विजयसिंह मोहिते – पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील यांच्यात बैठक झाली. सुमारे दीड तास या नेत्यांमध्ये बंद खोलीत चर्चा झाली. ते सन 2004 नंतर प्रथमच एकत्र आले होते.

या चर्चेनंतर माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले की, अनेक प्रश्नांवर आश्वासन देणे व त्याची अंमलबजावणी न करणे हे भाजपचे वैशिष्ट्य आहे. शेतीमालाच्या किमतीचा प्रश्न, ठराविक लाख तरुणांना नोकरीचा प्रश्न असे अनेक प्रश्न मागील जाहीरनाम्यातील त्यांनी पूर्ण केले नाहीत. ईडी यंत्रणेचा गैरवापर हे मोदींचे सूत्र आहे. आदिवासी मुख्यमंत्र्यांनी टीकाटिप्पणी केली तर त्यांना तुरुंगात टाकले जाते. मुख्यमंत्री केजरीवाल यांना तुरुंगात टाकणे, जामीन मिळू न देणे, याचा अर्थ स्पष्ट आहे की मोदी हे संसदीय लोकशाही उध्वस्त करून एका हुकूमशाही रस्त्यावर जायला निघालेले आहेत. त्यांच्यात आणि रशियाचे नेते पुतिन यांच्यात साम्य आहे. अशा प्रवृत्तीचा सर्वांनी एकत्र बसून पराभव करावा लागेल.

मोहिते पाटील यांच्यासह आम्ही चौघेही एकत्र आलो आहोत. याशिवाय डाव्या पक्षांनीही आम्हाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीचा समाधानकारक संदेश एखाद्या मतदारसंघापुरता सीमित न राहता तो राज्यात जाईल, त्याचा आम्हाला नक्कीच फायदा होईल. आजच्या बैठकीसाठी माण, खटाव, फलटण, सांगोला, माळशिरस, करमाळा व माढा या सगळ्या भागातील प्रमुख नेते उपस्थित आहेत. मागच्या निवडणुकीत आम्हास कमी जागा मिळाल्या. परंतु आता त्यात कित्येक पटीने वाढ होईल, अशी स्थिती आहे.

यावेळी शेकापाचे आ. जयंत पाटील, रघुनाथराजे निंबाळकर, माजी आ. धनाजी साठे, माजी आ. रामहरी रुपनवर, माजी आ. नारायण पाटील, आ.प्रकाश चव्हाण, राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, धैर्यशील मोहिते -पाटील, बाबासाहेब देशमुख, माजी जी.प. उपाध्यक्षा जयमाला गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीचे अध्यक्ष कविताताई म्हेत्रे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, शिवाजीराव कांबळे, संजय कोकाटे, संकल्प डोळस, चेतन नरोटे, सुरेश हसापुरे, भारत पाटील, वसंत चव्हाण, वैभवराजे जगताप, अभिजीत पाटील, संजय पाटील घाटणेकर, अनिल देसाई, बाबासाहेब माने, रणजीत देशमुख, प्रभाकर देशमुख यांच्यासह माढा व सोलापूर मतदार संघातील प्रमुख नेते उपस्थित होते.

Back to top button