Lok Sabha Election 2024 : माढ्यात होणार ईर्ष्येची लढत; रणजितसिंहांविरुद्ध कोण? | पुढारी

Lok Sabha Election 2024 : माढ्यात होणार ईर्ष्येची लढत; रणजितसिंहांविरुद्ध कोण?

माढा : योगेश चौगुले

माढा लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीतून भाजपने खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनाच पुन्हा एकदा संधी दिली आहे. फलटणचे रामराजे नाईक-निंबाळकर, अकलूजचे विजयसिंह मोहिते-पाटील या मातब्बरांसह आणखी काहीजणांचा विरोध असूनही रणजितसिंह यांनाच उमेदवारी देण्यात आल्याने माढ्याची लढत अटीतटीची होणार आहे. महाविकास आघाडीतून रणजितसिंहांविरुद्ध कोण असणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी माढा लोकसभा निवडणुकीत बंडखोरी उफाळण्याची चिन्हे अधिक आहेत.

शरद पवारांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात 2019 साली अनेक नाट्यमय घडामोडी घडून भाजपचे कमळ फुलले होते. फलटणचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर 84 हजार मतांच्या फरकाने निवडून आले होते. त्यावेळी अकलूजकर मोहिते-पाटील निंबाळकरांच्या पाठीशी ठाम उभे राहिले होते. राष्ट्रवादीतून लढलेल्या संजयमामा शिंदे यांनी त्यावेळी कडवी झुंज दिली होती. राज्याच्या राजकारणात अनेक अनपेक्षित स्थित्यंतरे झाल्याने यावेळच्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघ महायुतीतील घटक पक्षांपैकी कुणाच्या वाट्याला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाजपच्या अकलूजकर मोहिते- पाटलांनी खा. रणजितसिंहांच्या उमेदवारीला उघड विरोध करून माढ्यावर दावा सांगितला होता. धैर्यशील मोहिते पाटलांनी दुसर्‍यांदा मतदारसंघ पिंजायला सुरुवात केली होती. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून रणजितसिंह निंबाळकरांचे कट्टर विरोधक, विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनीही त्यांचे बंधू संजीवराजेंसाठी आरपारचा जोर लावला होता. राष्ट्रवादीच्या बैठकीत रामराजेंनी टोकाची भूमिका घेत माढ्याची जागा मिळाली नाही तर कार्यकर्ते ऐकणार नाहीत, अशीही भूमिका मांडली होती. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी माढ्यात खा. निंबाळकरांच्या विरोधात मोट बांधण्याचा जोरदार प्रयत्न केला होता. त्यातच माढ्यातील आणखी काही छोटे मोठे विरोधक रणजितसिंह निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध करत होते. इतका विरोध असतानाही भाजपने हा मतदारसंघ स्वतःकडेच ठेवून पुन्हा एकदा रणजितसिंह निंबाळकरांनाच उमेदवारी जाहीर केली आहे.

खा. निंबाळकरांना पुन्हा एकदा भाजपची उमेदवारी मिळताच फलटणमध्ये आ. रामराजे नाईक-निंबाळकर समर्थक कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. सोशल मीडियावर उलटसुलट पोस्ट व्हायरल होऊ लागल्या आहेत. तिकडे मोहिते-पाटील समर्थकही सोशल मीडियात टोकाची प्रतिक्रिया देऊ लागले आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीतील शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या वाट्याला आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून माणमधील अभयसिंह जगताप यांनी गेल्या काही महिन्यांपासून रान उठवले आहे. राष्ट्रवादीतील फाटाफुटीनंतर आपल्याकडे किती आयुधे शिल्लक राहिली आहेत याचा अभ्यास करून शरद पवारांनी माढ्यात सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी त्यांनी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्याशी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. मतदारसंघातील धनगर व इतर बहुजन समाजाची मते विचारात घेता शरद पवार यांनी फासे टाकले आहेत. महादेव जानकर माढ्यात कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Back to top button