Maratha Reservation : लोकसभेला गावागावांत उमेदवार देणार, मोहोळच्या बैठकीत निर्णय | पुढारी

Maratha Reservation : लोकसभेला गावागावांत उमेदवार देणार, मोहोळच्या बैठकीत निर्णय

रमेश दास

मोहोळ: सर्वसामान्य कुटुंबातील मराठा आंदोलकांची विशेष तपास पथक (एसआयटी) चौकशी रद्द करावी आणि मराठा आरक्षण देताना ‘सगेसोयरे’ अध्यादेशाची योग्य अंमलबजावणी करावी, अशी मागणी सकल मराठा समाजाने आज (दि.४) केली. यावेळी सर्वपक्षीय मराठा आमदार व खासदारांचा निषेध नोंदविण्यात आला. Maratha Reservation

राज्य सरकारने मराठा समाजाच्या मान्य केलेल्या मागण्या डावलल्यास आगामी सोलापूर लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावांतून दोन उमेदवार लोकसभेसाठी उभे करण्यात येतील, असे सकल मराठा समाजाने या बैठकीत जाहीर केले. Maratha Reservation

मराठा आरक्षण आंदोलनाची आगामी दिशा ठरविण्यासाठी सकल मराठा समाजाची मोहोळ-पंढरपूर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील श्रीराम मंगल कार्यालयात आज संवाद बैठक झाली. यावेळी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

सर्वसामान्य कुटुंबातील मनोज जरांगे-पाटील यांच्या सारख्या मराठा आंदोलकांवर सरकारने आकसापोटी ‘एसआयटी’ चौकशी लावली आहे. याबद्दल सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. मराठा आंदोलन चिरडण्यासाठी सरकार कुठल्याही थराला जात असून, त्यावर सरकारने एकदा चिंतन करावे. मराठा आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न जेवढा कराल तितक्याच ताकदीने मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा बैठकीत देण्यात आला.

मराठा समाजाला न्याय मिळणारनाही तोपर्यंत मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. सरकारने संवैधानिक पद्धतीने ओबीसी प्रवर्गातून ५० टक्क्यांच्या आत मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, तर आगामी लोकसभा निवडणुकीत हजारो उमेदवार उभे करून असहकार चळवळ उभी करण्यात येईल, असेही जाहीर करण्यात आले. मनोज जरांगे- पाटील यांना अटक केल्यास गावागावातून ‘जेल भरो’ आंदोलन करण्यात येईल.असेही यावेळी जाहीर करण्यात आले.

या बैठकीला मराठा समन्वयक माऊली पवार, अॅड. श्रीरंग लाळे, प्रा. संतोष गायकवाड, दीपक गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, नाना डोके, प्रभाकर देशमुख, मनोज मोरे, नंदकुमार फाटे, डॉ. प्रमोद पाटील, शिवरत्न गायकवाड, प्रमोद डोके, सीमाताई पाटील, ज्योत्साताई पाटील, संगिता फाटे, डॉ. स्मिता पाटील, शुभांगी लंबे, वैभव गुंड, अनिल गाडे, शाहूराजे देशमुख आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button