माहिती तंत्रज्ञान युगात मातृभाषेचे बोल ‘बोबडे’ | पुढारी

माहिती तंत्रज्ञान युगात मातृभाषेचे बोल ‘बोबडे’

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : ज्या भाषेत आपण बोलणे सुरू करतो, पहिल्यांदा ज्या भाषेशी आपला परिचय होतो, ज्या भाषेच्या सान्निध्यात आपण राहतो, वाढतो, तीच आपली मातृभाषा. युनायटेड नेशन्सच्या अहवालानुसार, जगभरात बोलल्या जाणार्‍या 6000 भाषांपैकी जवळपास 2680 भाषा (43 टक्के) लुप्त होत आहेत. लुप्त होण्याचे प्रमाण खूप जास्त आणि वेगवान आहे. ही बाब धोकादायक आहे. वाघिणीचे दूध म्हणून भाषेचा अतिरेक होत आहे, त्या इंग्रजी भाषेमुळे आणि त्यातील शिक्षणामुळे मातृभाषेबरोबरच अन्य बोलीभाषांचा गळा दाबला जात आहे. ही बाब भारतीय संस्कृतीसाठी धोकादायक आहे. आदिवासी, पारधी, बंजारा, कैकाडी, वडार यांसह भटक्या-विमुक्त समाजांच्या अनेक बोलीभाषा आहेत. त्यांचे अस्तित्व भाषेवरील जागतिक हल्ल्याने नष्ट होत आहे. भाषेबरोबरच त्यातील लोकसाहित्य, म्हणी, वाक्प्रचार, गाणी, संस्कृतीही नष्ट होत आहे. ही प्रादेशिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक वारसासाठी धोकादायक बाब आहे. अशात डिजिटल प्लॅटफॉर्मवरही शंभरहून कमी भाषा वापरल्या जात आहेत, ही बाबही धोक्याची आहे.

मातृभाषेत बोलणारा अडाणी

इंग्रजी भाषेचे पांघरुण घातलेले लोक मातृभाषेत बोलायला टाळतात. जर कोणी मातृभाषेत बोलले, तर त्याला अडाणी समजले जाते. त्याच्या कौशल्याचा अवमान केला जातो. खरे तर हा गैरसमज आहे. इंग्रजी मानसिकतेने भाषेला सामाजिक स्थितीशी जोडले आहे. जर मातृभाषेचे संवर्धन केले नाही, तर भाषिक विविधता आपसूकच नाहीशी होईल. यासाठी प्रत्येकाने मातृभाषेतूनच संवाद साधवा आणि शिक्षण घ्यावे.

का साजरा करतात मातृभाषा दिवस?

भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानची निर्मिती झाली, तेव्हा पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे दोन भाग होते. पश्चिम बांगलादेशमध्ये उर्दू आणि पश्चिम बांगलादेशमध्ये बंगाली भाषिकांचे प्रमाण अधिक होते. तत्कालीन पाकिस्तान सरकारने भाषा धोरण लागू करून पाकिस्तानची अधिकृत भाषा म्हणून उर्दूला मान्यता दिली होती. पाकिस्तान सरकारच्या या धोरणाच्या विरोधात ढाका विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. आंदोलकांवर पोलिसांनी 21 फेब्रुवारी, 1952 रोजी गोळीबार केला होता. आंदोलनाच्या परिणामी पाकिस्तान सरकारला नमते घ्यावे लागले व बंगाली भाषेलाही मान्यता दिली. यामुळे 21 फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन म्हणून युनेस्कोने मान्यता दिली आहे.

भारतात 1300 मातृभाषा

* जगात सुमारे 7 हजार भाषा बोलल्या जातात.
* भारतातही प्रामुख्याने 22 भाषा बोलल्या जातात.
* भारतात जवळपास 1 हजार 300 च्या आसपास मातृभाषा आहेत.

Back to top button