सोलापूर: रानमसलेत भरदिवसा घरफोडी : ८ लाखांची रोकड लंपास | पुढारी

सोलापूर: रानमसलेत भरदिवसा घरफोडी : ८ लाखांची रोकड लंपास

उत्तर सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : रानमसले (ता. उत्तर सोलापूर) येथील शेतकरी मधुकर बाळासाहेब गरड यांच्या रानमसले शिवारातील शेतातील घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञातांनी कपाटातील ८ लाखांची रोकड लंपास केली. ही घटना मंगळवारी (दि.३०) घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, रानमसलेत गरड हे कुटुंब स्वतःची शेती करुन कुटुंबाची उपजीविका करते. मागील वर्षी त्यांना कांदा, सोयाबीनच्या विक्रीतून ६ लाख मिळाले होते. अशी एकूण ८ लाख १० हजारांची रक्कम त्यांनी शेतात गोठा बांधण्यासाठी ७ ते ८ महिन्यांपूर्वी घरी कपाटात आणून ठेवली होती.

दरम्यान, मंगळवारी घरी मधूकर यांच्या पत्नी स्मिता एकट्याच होत्या. त्या शेतातील बोर चालू करुन घरी आल्या होत्या. त्यावेळेस घराचा लाकडी दरवाज्याचे कुलुप तोडून घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी फोनद्वारे घरात चोरी झाल्याची माहिती पतींना दिली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच श्वान पथक मागविण्यात आले. घटनास्थळी सोलापूर पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, डीवाय एसपी यामवर, एलसीबी पोलीस अधिकारी, तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे दाखल झाले. तालुका पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button