ओबीसीतून मराठा आरक्षण घेऊ देणार नाही : भुजबळ

ओबीसीतून मराठा आरक्षण घेऊ देणार नाही : भुजबळ

पंढरपूर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. मात्र, हे आरक्षण स्वतंत्रपणे घ्या, ओबीसीतून घेऊ देणार नाही, हे लक्षात ठेवा, असे सांगत मराठा आरक्षणासाठी ज्यांनी प्राणांची आहुती दिली त्यांना स्वतःच्या अंगावर फुले उधळून घेताना विसरू नका, असा टोला मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांचे नाव न घेता लगावला.

पंढरपूर येथे ओबीसी, भटके विमुक्तांचा एल्गार महामेळावा झाला. या महामेळाव्यात ते बोलत होते.

भुजबळ म्हणाले, सत्यशोधक सिनेमा आवर्जून पाहा. त्यामुळे आपल्या समाजाचे वास्तव कळेल. तेव्हा तुम्ही खर्‍या अर्थाने पेटून उठाल. जे जे आपल्यावर अन्याय करतील, त्यांच्याविरोधात लढायला तयार राहा, असे आवाहन त्यांनी ओबीसी समाजाला केले. तसेच जेवढे आमचे आरक्षण आहे, तेवढ्या शासकीय नोकरीत जागा भरा, एवढे तरी काम करा, असे आवाहन त्यांनी सरकारला केले. तसेच ओबीसी आरक्षण बचावासाठी मी मागेपुढे पाहत नाही. मंत्रिपद गेले, आमदार की गेली, तरी मी गप्प बसणार नसल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

मी मराठा समाज किंवा ओबीसी समाजात भांडण लावत नाही अथवा तेढ निर्माण करत नाही. मात्र, जालना येथील भरसभेत नाव न घेता मला शिव्या दिल्या असल्याचा आरोप भुजबळ यांनी जरांगे यांचे नाव न घेता केला.

आता ओबीसी समाजाला गावागावांत लढा उभारावा लागणार आहे. मराठा-कुणबी दाखले, तसेच जनगणना करताना लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

भुजबळांनी स्वतंत्र पक्ष काढावा, आम्ही त्यांच्या सोबत : आ. जानकर

आमदार महादेव जानकर म्हणाले, विधानसभेत आवाज उठवण्याचे काम भुजबळ यांनी केले. ओबीसीची संख्या 85 टक्के आहे. मात्र, मेळाव्याला, सभेला कमी लोक येतात. तेव्हा भुजबळांनी स्वतंत्र पक्ष काढावा, असे सांगत मी या लढ्यात तुमच्या बरोबर असल्याचे सांगितले.

गरिबी आणणार्‍यांना विचारा : आ. शेंडगे

आमदार प्रकाश शेंडगे म्हणाले की, सर्व ओबीसी समाज एक झाला, तर मराठ्यांना ओबीसीत येऊ देणार नाही. जेसीबीतून फुले उधळणार्‍यांना कसली आली गरिबी? गरिबी ज्यांनी आणली त्यांना आरक्षणाचे विचारा, आत्महत्या करायला लावणार्‍यांना विचारा, या शब्दांत नाव न घेता त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. जरांगे तुम्ही मुंबईला या. आम्ही फक्त मुंबईतील ओबीसी घराबाहेर पडलो, तर अख्खी मुंबई जाम होईल. तेव्हा बघू कोण मुंबईत येते, असे आव्हान त्यांनी दिले.

याप्रसंगी मुस्लिम समाजाचे नेते शब्बीर अन्सारी, डॉ. बाबासाहेब देशमुख, माऊली हल नवर, दौलत शितोळे उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news