Old Pension : सोलापुरात महसूल, झेडपीचे कामकाज बंद; जुनी पेन्शनची मागणी | पुढारी

Old Pension : सोलापुरात महसूल, झेडपीचे कामकाज बंद; जुनी पेन्शनची मागणी

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : जुनी पेन्शन लागू करणे ( Old Pension )व कंत्राटी कर्मचारी सेवेत कायम करणे या दोन प्रमुख मागणीसाठी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारत कामकाज बंद केलं आहे. गुरुवारपासून कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर एकत्र येऊन या आंदोलन करत निदर्शने केली. ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ असा नारा त्यावेळी दिला. काही संघटनांनी या संपाला पाठिंबा दिला. मात्र, प्रत्यक्ष सहभाग नोंदविण्यात आला नाही.

संबंधित बातम्या 

यामध्ये राज्य कर्मचारी संघटना, महसूल कर्मचारी संघटना, जिल्हा परिषदेमधील जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, जिल्हा परिषद लेखा संघटना, अंगणवाडी पर्यवेक्षिका संघटना, जिल्हा परिषद कृषी संघटना, जिल्हा परिषद कंत्राटी कर्मचारी युनियन, जिल्हा परिषद दिव्यांग संघटना या संघटनांनी संपामध्ये सहभाग नोंदविला आहे. परंतु, जिल्हा परिषदेमधील मागासवर्गीय बहुजन कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, जिल्हा परिषद कास्ट्राईब कर्मचारी संघटना या संघटनांनी सहभाग नोंदवलेला नाही.

या संपामध्ये लिपिक वर्गीय संघटनेचे अविनाश गोडसे, कर्मचारी महासंघाचे दिनेश बनसोडे, सचिन मायनाळ, सुरेश राठोड, लेखा संघटनेचे उमाकांत राजगुरू, अनिस म्हेत्रस, कंत्राटी कर्मचारी संघटनेचे सचिन जाधव, दिव्यांग संघटनेचे लक्ष्मण वंजारी, महिला संघटनेचे ज्योत्स्ना साठे, ज्योती लामकाने, शंतनू गायकवाड यांनी यावेळी नेतृत्व केले. माध्यमांशी आपली भूमिका स्पष्ट करताना जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे, जुनी पेन्शन ही काळाची गरज आहे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केलेच पाहिजे अशी मागणी यावेळी केली. ( Old Pension )

 

Back to top button