Solapur News: आर्थिक लोभापायी लग्न करून फसवणूक करणाऱ्या पत्नीविरोधात तरुणाचे उपोषण | पुढारी

Solapur News: आर्थिक लोभापायी लग्न करून फसवणूक करणाऱ्या पत्नीविरोधात तरुणाचे उपोषण

करमाळा: पुढारी वृत्तसेवा : दोन-दोन विवाह करून लाखो रुपये उकळून फसवणूक करणाऱ्या पत्नी आणि तिच्या पाच नातेवाईकांना तत्काळ अटक करून कारवाई करावी, या मागणीसाठी गुळसडी येथील सुनील गणपत भोसले याने तहसिल कार्यालयासमोर दोन दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. Solapur News

या प्रकरणी भोसले यांनी न्यायालयामार्फत करमाळा पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. मात्र, दोन महिने होऊन ही कोणतीच कारवाई न केल्याने करमाळा पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयाच्या आवारात भोसले यांनी दोन दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे.
राजेंद्र सोपान चव्हाण, कुसुम राजेंद्र चव्हाण, सिद्धार्थ राजेंद्र चव्हाण, राहुल रामदास कांबळे, आजिनाथ सिताराम चव्हाण, करीना राजेंद्र चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Solapur News

याबाबत अधिक माहिती अशी की, करिना राजेंद्र चव्हाण (रा. पिंपळवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) हिच्याशी गुळसडी येथील सुनील गणपत भोसले याच्याशी २० जुन २०२२ रोजी आळंदी येथे विवाह झाला होता. या लग्नासाठी भोसले यांनी ३ लाख रुपये करिना हिच्या नातेवाईकांना दिले होते. लग्नानंतर सुनील भोसले याच्याबरोबर दोन महिने गुळसडी येथे राहिल्यानंतर करीनाला तिच्या नातेवाईकांनी तिला अचानक पिपंळवाडी येथे माहेरी आणले होते. त्यानंतर तिला सुनील भोसले यांनी आपल्या घरी आणण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केला. मात्र, तिच्या नातेवाईकांनी विरोध करून ती येणार नसल्याचे सांगितले.

दरम्यान, करिना हिचा यापूर्वी २९ जून २०२० रोजी कुळधरण येथील सचिन गजरमल याच्याशी विवाह झाल्याची माहिती मिळाली. तेथेही केवळ एक महिना नांदून ती पुन्हा पिंपळवाडी येथे तिला तिच्या नातेवाईकांनी आणून ठेवली होती. सचिन गरजमल याचीही पैसे घेऊन अशीच फसवणूक करण्यात आली आहे. अशी तक्रार सुनील भोसले यांनी करमाळा पोलिसांत केली होती. मात्र, पोलिसांनी उलट तक्रारदार सुनील भोसले यालाच दमदाटी करून हाकलून देत तुझ्यावरच ४९८ चा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली होती.

दरम्यान, करमाळा पोलिसांनी तक्रार दाखल करून न घेतल्याने करमाळा न्यायालयामार्फत पत्नी करीना व तिच्या ५ नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला. त्या अनुषंगाने ५ ऑक्टोबर २०२३ रोजी करमाळा पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली. परंतु आजपर्यंत करमाळा पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून सुनील भोसले आमरण उपोषणाला बसला आहे. दरम्यान, संशयित आरोपींपैकी काही अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा 

Back to top button