

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण मिळणार असा पुनरुच्चार करत आपले प्रश्न मांडताना दुसरा समाज दुखावला जाणार नाही, याकडे लक्ष देणे सध्या गरजेचे असून अपशब्द वापरून तेढ निर्माण होईल, असे बोलणे सर्वांनीच टाळणे गरजेचे आहे. वारकरी संप्रदायात एकमेकांचा आदर ठेवला जातो. त्याप्रमाणे प्रत्येकाने आदर ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येकाने समाजातील बंधुभाव टिकवून ठेवण्याची नितांत गरज असल्याचेही प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा केल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस गुरुवारी पहाटे श्री विठ्ठल मंदिरात पत्रकारांशी बोलत होते. पंढरीत विठ्ठलाच्या दर्शनाला वर्षाला एक कोटीहून अधिक भाविक येतात. आलेल्या भाविकांना सोयीसुविधा देण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. आता शासनाच्या वतीने नवीन विकास कामे करण्यात येणार आहेत.
राज्यातील नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून सेवा दिल्या जात आहेत. महाआरोग्य शिबीरे आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी राबवण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत केली.
खा. शरद पवार कुटुंबीयांकडून आपणावर वारंवार टीका केली जात आहे. याबाबत विचारले असता उपमुख्यमंत्री फडवणीस म्हणाले, आपण विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यासाठी आलो आहोत, हे राजकीय ठिकाण नाही; त्यामुळे राजकीय भाष्य नको. परंतु, एवढेच सांगतो की, पवार कुटुंबीयांना विठ्ठलाने सद्बुद्धी द्यावी. आपण येणारी आषाढी यात्रेची शासकीय महापूजा करणार आहात का? असे विचारले असता जेव्हाचे तेव्हा बघू, असे हसत हसत उत्तर दिले.