मागण्या मांडणे योग्य मात्र समाजात तेढ निर्माण करणं अयोग्य : देवेंद्र फडणवीस | पुढारी

मागण्या मांडणे योग्य मात्र समाजात तेढ निर्माण करणं अयोग्य : देवेंद्र फडणवीस

सोलापूर; महेश पांढरे : विविध समाजाच्या आरक्षणाचा विषय सध्या सुरु आहे. मराठा, धनगर समाजाचे सध्या आंदोलने, मोर्चे मेळावे सुरु आहेत. या दरम्यान आपल्या न्याय मागण्या मांडणे योग्य आहे. मात्र समाजात तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्य करणे किंवा एक समाज दुसर्‍या समाजाच्या विरोधात उभा ठाकणे हे अयोग्य आहे. लवकरच आरक्षणासह राज्यातील विविध प्रश्‍न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मार्गी लावू, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर येथे केले.

कार्तिकवारी निमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर सोलापूर दौर्‍यावर आहेत. शासकीय महापूजा झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी राज्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रश्‍नांचा भडीमार केला. मात्र राजकारणात तरबेज असलेल्या फडणवीस यांनी प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर अगदी मुस्सद्दीपणाने दिले. मराठा समाजाने पुजेला दर्शविलेला विरोध सोडून पूजा करण्यासाठी परवानगी दिली. याबद्दल फडणवीस यांनी मराठा समाजाचे आभार मानले.

दुध दरवाढ, शेतकर्‍यांचे प्रश्‍न, कामगारांचे प्रश्‍न, पंढरपूर शहर व सोलापूर जिल्ह्यातील रखडलेली विकास कामे यावर ही फडणवीस यांनी भाष्य केले. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व प्रश्‍न मार्गी लावण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे. मात्र राज्यातील शांतता आणि सुव्यवस्था बिघडू नये, याची काळजी सर्वांनीच घ्यावी. नेत्यांनी बोलतानाही याचे भान राखावे, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री सुरेश खाडे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, आ. समाधान आवताडे, आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यातील जनतेला दिलेल्या अश्‍वासनांची पुर्तता करण्यासाठी आम्ही कट्टीबद्ध आहोत. त्यावर कुणी शंका घेण्याचे कारण नाही. आरेाग्य मंत्र्यांनी सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याची चांगली काळजी घेतली आहे. प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरेाग्य सेवा देण्याचे काम सुरु झालेले आहे. राज्यात विविध ठिकाणी जवळपास १४ मेडिकल महाविद्यालये सुरु करण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे. महात्मा फुले जन आरोग्य अभियानातून ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार सर्वांनाच मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. काही उपचारासाठी आकारण्यात येणारी नाममात्र रक्कम बंद केली आहे. राज्यातील सर्वांनाच मोफत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यावर आमचा भर राहणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे.

Back to top button