बालाजी दर्शन; वृद्ध, दिव्यांगांना ऑनलाईन बुकिंग गरजेचे | पुढारी

बालाजी दर्शन; वृद्ध, दिव्यांगांना ऑनलाईन बुकिंग गरजेचे

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील प्रसिद्ध भगवान बालाजी अर्थात व्यंकटेश्वरांचे थेट दर्शन घेण्यासाठी वृद्ध, अपंग आदींना तिरुमला तिरुपती देवस्थानने (टीटीडी) ऑनलाईन बुकिंग करणे बंधनकारक आहे. या मोफत सेवेचा लाभ दररोज एक हजार भाविक घेत आहेत.

65 किंवा त्याहून अधिक वय असणार्‍यांसाठी यापूर्वी टीटीडीतर्फे ऑफलाईन पद्धतीने बालाजींचे दर्शन दिले जायचे. सकाळी 10 तसेच दुपारी तीन वाजता वृद्ध, दिव्यांग तसेच दुर्धर आजार असणार्‍यांसाठी ही सेवा होती. या भाविकांना थेट मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून मंदिरात सोडले जायचे, पण गत काही महिन्यांपासून टीटीडीने ऑफलाईन सेवेमध्ये बदल करीत ही सेवा ऑनलाईन केली. यानुसार आता वृद्ध, दिव्यांग तसेच दुर्धर आजार असणार्‍यांसाठी थेट दर्शनाचा लाभ घेण्यासाठी आगाऊ ऑनलाईन बुकिंग करणे बंधनकारक आहे. अशा भाविकांना ठरलेल्या दिवशी दुपारी एक वाजता मंदिराजवळ जावे लागणार आहे. त्यानंतर बुकिंग तिकिटाची तपासणी करून त्यांना दुुपारी तीन वाजता थेट मंदिरात सोडण्यात येईल. यावेळी अन्य दर्शन रांगा बंद ठेवून केवळ वृद्ध, दिव्यांग, दुर्धर व्यक्तींनाच मंदिरात थेट दर्शनाची सुविधा दिली जात आहे. अवघ्या अर्ध्या तासांत या भाविकांचा बालाजींचे दर्शन होणार आहे.

वयाबाबत अशा आहेत अटी

वृद्ध व्यक्तींचे वय किमान 65 असावे. वृद्धासोबत मदतीला येणार्‍या पत्नी, मुलांचे वय हे 50 पेक्षा अधिक असावे. दिव्यांग तसेच दुर्धर आजार असलेल्या भक्तांसाठी वा त्यांच्या नातेवाईकांसाठी वयाची कुठलीही अट नाही. दररोज एक हजार जणांसाठी ही सेवा दिली जात आहे.

Back to top button