Maratha Reservation: मराठा आरक्षणावरून मोडनिंब येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू

Maratha Reservation
Maratha Reservation

मोडनिंब; पुढारी वृत्तसेवा: सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मोडनिंब येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. सलग तीन दिवस सुरू असलेल्या या उपोषणाला विविध संघटना पाठिंबा देत आहेत. मोडनिंब जिल्हा परिषद गटाअंतर्गत मोडनिंब येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी साखळी उपोषण सुरू आहे. मराठा आरक्षण संदर्भात जनजागृती व्हावी यासाठी ग्राम फेरी, शाहिरी पोवाडा गायन, विविध नागरिकांची मनोगते, कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान मोडनिंब जिल्हा परिषद गटातील दररोज एक गाव या आंदोलनात सहभागी होत आहे.

मोडनिंबनंतर दुसऱ्या दिवशी अरणगावाने सहभाग नोंदवला. शिवाजी कांबळे, भारत शिंदे, अंकुश जाधव यांनी आंदोलनात सहभागी होत जरांगे- पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा जाहीर केला. विविध प्रकारे आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यानंतर तिसऱ्या दिवशी बैरागवाडी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपोषणात सहभागी झाले आहेत.

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे- पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातील भूमिकेला यावेळी सर्व उपस्थितांनी भाषणातून पाठिंबा देत आहेत. राजकीय पुढार्‍यांना गावबंदी आणि मतदानावर बहिष्कार असा ठराव घेतलेल्या मोडनिंब ग्रामपंचायत कार्यालयावर आमदार बबनराव शिंदे यांचा डिजिटल बोर्ड होता. सकल मराठा समाजाच्या मागणीवरून हा बोर्ड उतरण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून बैरागवाडी नागरिकांनी सहभाग दाखवला. आकांक्षा शिरसट, ऋतुजा सुर्वे यांनी मनोगत व्यक्त केले.

माढा तालुका सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष प्रमोद गाडे यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा म्हणून आपल्या पदाचा राजीनामा देत कोणत्याही कार्यक्रमाला इथून पुढे हजर राहणार नाही अशा पद्धतीचे मत उपोषण स्थळी व्यक्त केले. दररोज संध्याकाळी सरकारचा निषेध म्हणून कॅण्डल मार्च चे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी शेकडोच्या संख्येने मराठा बांधव सहभागी होऊन निषेध नोंदवत आहेत. या आंदोलनाला सामाजिक संघटनांसह अन्य संघटनांनी देखील लेखी पत्राद्वारे पाठिंबा दिला आहे. मोडनिंब पंचक्रोशीतील महिलाही मराठा आंदोलनात सहभागी होणार आहेत अशी माहिती यावेळी आंदोलकांनी दिली आहे. सरकारचा निषेध म्हणून मोडनिंब बसस्थानकावर आलेल्या एसटी बसेस वरील शासनाच्या जाहिरातीवर काळे फासण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news