सोलापूर : महापौरांसह १५ जणांचे नगरसेवकपद रद्द करा | पुढारी

सोलापूर : महापौरांसह १५ जणांचे नगरसेवकपद रद्द करा

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : प्रभाग क्रमांक तीनमधील घोंगडे वस्ती येथील लेंडकी नाल्यानजीकच्या अतिक्रमित घरांना महापौर श्रीकांचना यन्नम यांच्यासह 15 जणांची पाठराखण करीत अभय दिले. यामुळे महापालिकेच्या हिताविरोधात कारभार करणार्‍या या सर्वांचे नगरसेवकपद रद्द करावे, या मागणीसाठी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी आयुक्तांकडे केली आहे. हा भाजपकडून घरचा आहेर असून यानिमित्ताने भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

नगरसेवक सुरेश पाटील यांच्या तक्रारीवरून महापालिकेने 16 जून रोजी घोंगडे वस्ती येथील लेंडकी नाल्यानजीकची पावसाळी पाण्याच्या प्रवाहाला अडथळा आणणारी 13 घरे पाडण्यात आली होती. त्या कारवाईवेळी काही नगरसेवकांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर या विषयावर 18 जून रोजीच्या महापालिका सभेत पडसाद उमटले होते. यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाच्या घरे पाडण्याच्या धोरणाबाबत तीव्र हरकत घेत गदारोळ केला होता.

त्यावेळी सभेत या विषयासंदर्भात आपल्याला बोलण्याची संधी द्यावी, अशी मागणी सुरेश पाटील यांनी महापौर यन्नम यांच्याकडे वारंवार केली होती. मात्र त्यांना यन्नम यांनी बोलण्याची संधी दिली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पाटील यांनी महापौरांना घरचा आहेर दिला. यास सर्वपक्षीयांनी हरकत घेत पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली. त्यानुसार महापौरांनी पाटील यांचे नगरसेवकपद एक दिवसासाठी निलंबित केले होते.

यानंतर यन्नम यांनी पोलिसांकरवी पाटील यांना सभागृहाबाहेर काढले होते. यन्नम यांनी यासंदर्भात सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेतली. तसेच प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे बेघर झालेल्या लोकांचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र अतिक्रमणधारकांना अभय देणे हे महापालिकेच्या नगरसेवकांना शोभणारे नाही. नगरसेवकच जर अतिक्रमाणास पाठीशी घालत असतील तर आयुक्तांनी त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशी मागणी नगरसेवक सुरेश पाटील यांनी केली आहे. पाटील यांनीच महापौरांवरच कारवाई करण्याची मागणी करीत भाजपला घरचा आहेर दिला आहे. या विषयावरून राजकीय धुराळा उठवण्याची चिन्हे आहेत.

Back to top button