विवाहाच्या आमिषाने बलात्कार; सोलापूर येथील तरुणास अटक | पुढारी

विवाहाच्या आमिषाने बलात्कार; सोलापूर येथील तरुणास अटक

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : विवाहाचे आमिष दाखवून सोलापुरात तरुणीवर बलात्कार करण्यात आला. तसेच तिचा दुसरीकडे विवाह झाल्यानंतरही तिला घटस्फोट घेण्यासाठी ब्लॅकमेल करण्यात आले. याप्रकरणी संतोष मारुती कामाठी (रा. न्यू पाच्छा पेठ, पाथरुड चौक) याच्याविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली. त्याला मदत करणार्‍या प्रसन्न दीपक वाघमारे, दिपक रोहिदास वाघमारे, मंगला दीपक वाघमारे सर्व (रा. सहस्त्रार्जुननगर, जुळे सोलापूर) या तिघांविरुद्धही गुन्हा दाखल झाला असून, ते फरार आहेत.

याबाबत विवाहितेने फिर्यादीत म्हटले आहे, तिच्या चुलतभावाने सन 2014 मध्ये संतोष कामाठी याच्या बरोबर तिची ओळख करून दिली. त्यानंतर तिचे व कामाठी यांच्यात प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर सन 2016 मध्ये कामाठी याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. तिच्या घरात कोणी नाही हे पाहून तिच्या घरात घुसून तिच्यावर जबदस्तीने बलात्कार केला. आज-उद्या विवाह करू असे सांगून वेळोवेळी बलात्कार केला.

कामाठी हा विवाहास टाळाटाळ करीत असता त्या तरुणीने चौकशी केली. त्यावेळी कामाठी याचा विाह झाल्याचे तिला समजले. त्यानंतर कामाठी याने ‘तू घटस्फोट घे, आपण पळून जावू’ असे तिला फोन करून सांगितले. पण तिने त्याला टाळले.

दरम्यान, संबंधित विवाहितेच्या सासरी कोणीतरी निनावी पत्र पाठविले. त्यात कामाठी व विवाहितेचे अनैतिक संबंध होते, असे त्याद्वारे कळविले. त्यामुळे तिच्या सासरचे लोक तिला नांदविण्यास नेत नव्हते. त्यामुळे अखेर संबंधित विवाहितेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक जगताप हे करीत आहेत.

Back to top button