Maratha Reservation : मनोज जरांगे – पाटलांची तोफ आज सोलापुरात धडाडणार | पुढारी

Maratha Reservation : मनोज जरांगे - पाटलांची तोफ आज सोलापुरात धडाडणार

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  मराठा आरक्षणाची पेटविलेली ठिणगी महाराष्ट्रभर पोहोचविण्यासाठी गुरुवारी (दि. ५) मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सोलापुरात जाहीर सभा होणार आहे. यावेळी जिल्ह्यातून हजारो मराठा बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती सकल मराठा समन्वयक माऊली पवार यांनी दिली. मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सरकार आणि मंत्रिमंडळाला घाम फोडणारे मराठा योद्धा जरांगे-पाटील यांची जाहीर सभा सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये गुरुवारी दुपारी दोन वाजता होणार आहे.

या सभेसाठी हजारो समाजबांधव एकवटणार असून मराठा आरक्षणाची ही अखेरची लढाई आहे. घरी बसून चालणार नाही. त्यामुळे सर्वांनी या सभेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा सकल मोर्चाचे समन्वयक पवार यांनी केले आहे. जरांगे पाटील हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. यावेळी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना अभिवादन करुन हुतात्मा स्मृती मंदिर येथे जाहीर सभा घेणार आहेत

तीनशे भगवे झेंडे, दोन एलईडी टीव्हींची व्यवस्था

जरांगे-पाटील यांची हुतात्मा स्मृती मंदिर येथे जाहीर सभा होत आहे. यावेळी ३०० भगवे झेंडे आणि दोन मोठ्या एलईडी टीव्हींची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी छत्रपती संभाजी महाराज चौक ते पार्क चौकादरम्यान भगवे झेंडे लावण्यात येणार आहेत

दहा गाड्यांचा असणार ताफा

जरांगे-पाटील हे उस्मानाबाद येथे जाहीर सभा घेऊन दुपारी दोन वाजता सोलापुरात येणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत दहा गाड्यांचा ताफा असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून जीपमध्ये त्यांची मिरवणूक पार्क चौकापर्यंत निघणार आहे. त्यानंतर जाहीर सभा होणार आहे.

Back to top button