सोलापूर : धनगर आरक्षणासाठी कार्यकर्ते आक्रमक, मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा फेकला | पुढारी

सोलापूर : धनगर आरक्षणासाठी कार्यकर्ते आक्रमक, मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा फेकला

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा मराठा आरक्षणानंतर आता धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा पुढे आला असून, धनगर समाजाचे सामाजिक कार्यकर्ते शेखर बंगाळे यांनी आज (शुक्रवार) पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर शासकीय विश्रामगृहात भंडारा उधळून धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी केली.

दरम्यान यावेळी उपस्थित बॉडीगार्ड, सोलापुरातील भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी त्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला मारहाण केली.

एकीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. त्यानंतर आता धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुन्हा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी नियोजन बैठका घेऊन मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शासकीय विश्रामगृहात ते विविध नागरिकांचे निवेदन घेत होते. याच वेळी धनगर समाजाचे सामाजिक कार्यकर्ते शेखर बंगाळे व त्यांचे कार्यकर्ते सात रस्त्यातील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदन दिले.

कित्येक वर्षांपासून धनगर समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहे, लवकरात लवकर आरक्षण द्या असे बोलत असताना अचानक खिशामध्ये हात घालीत कागदामध्ये गुंडाळून आणलेला भंडारा पालकमंत्र्यांच्या अंगावर उधळला, येळकोट येळकोट जय मल्हार, धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी उपस्थित बॉडीगार्ड, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी त्या कार्यकर्त्याला मारहाण केली व पोलिसांच्या ताब्यात दिले.

हेही वाचा : 

Back to top button