पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा : अधिक मासातील कमला एकादशीनिमित्त शनिवारी (दि. 12) लाखोंच्या संख्येने भाविक पंढरीत दाखल झाले. चंद्रभागा स्नान, मुखदर्शन व पदस्पर्श दर्शन घेण्यास भाविकांनी गर्दी केली होती. दर्शन रांग गोपाळपूर रोडवरील पत्राशेडमध्ये पोहोचली. दर्शन रांगेत लाखाहून अधिक भाविक उभे होते. दोन लाखांहून अधिक भाविकांनी एकादशीला उपस्थिती लावल्याने मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, स्टेशन रोड, प्रदक्षिणा मार्ग, भक्तिमार्ग भाविकांनी फुलून गेला.
अधिक मासाचा उत्तरार्ध सुरू आहे. यातच कमला एकादशी आल्याने आणि वीकेंडचा शनिवार असल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने येत असल्याने त्यांच्या वाहनांनी
शहरातील वाहनतळ हाऊसफुल्ल झाले होते.
दर्शन रांगेत उभे राहून पदस्पर्श दर्शन घेण्यावर भाविकांचा भर दिसून आला. श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांना अधिकाधिक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्याचबरोबर भाविकांना महाप्रसाद उपलब्ध करून देण्यात आला. भाविक दर्शनानंतर प्रासादिक साहित्य खरेदीसाठी गर्दी करताना दिसून आले.