Solapur robbery : अरण येथे दोन ठिकाणी दरोडा; दरोडेखोरांकडून एकास बेदम मारहाण | पुढारी

Solapur robbery : अरण येथे दोन ठिकाणी दरोडा; दरोडेखोरांकडून एकास बेदम मारहाण

मोडनिंब : पुढारी वृत्तसेवा : सोलापूर- पुणे महामार्गावर अरण हद्दीत सावंत पाटील वस्ती आणि रणदिवे वस्ती येथे गुरूवारी (दि.३) रात्री दोनच्या सुमारास दरोडा (Solapur robbery) टाकण्यात आला. यावेळी एका नागरिकास चोरट्यांनी बेदम मारहाण केली आहे. याबाबत टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल झाली आहे.

रणदिवे वस्ती येथील रामभाऊ गंगाराम रणदिवे हे सोलापूर – पुणे महामार्गावर महाळुंगी मंदिराजवळ टेंभुर्णीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सर्विस रोडवर राहत आहेत. रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास सहा ते सात चोरट्यांनी रणदिवे यांच्या बंगल्यावर सापळा रचून बेदम मारहाण करीत जबरी चोरी केली. (Solapur robbery)

रणदिवे यांच्या बंगल्याचे दोन गेट तोडून तसेच दरवाजाची मोडतोड करत चोरट्यांनी आत प्रवेश केला. तीन ते चार जण घरात घुसले, एक जण बाहेर थांबला होता. हॉल तसेच इतर ठिकाणाची झाडाझडती घेऊन चोरट्याने कपाटातील वस्तूंची चोरी केली.

रामभाऊ तसेच त्यांच्या पत्नी झोपलेल्या बेडमध्ये चोरट्याने प्रवेश केला. अज्ञात एका चोरट्याने त्यांना मारण्यास सुरुवात केली सत्तुरने डोक्यात मारले. यामुळे ते रक्तबंबाळ झाले. त्यांना पाठीत गुडघ्यावर मांड्यांवर पायांवर काठीने मारहाण केली आहे. रामभाऊ यांनी यावेळी मारताना विरोध केल्याने चोरटे बाहेर पळून गेले. यावेळी त्यांच्या पत्नीने किचनमध्ये जाऊन आतून कोंडून घेतले व इतरांना फोन करून ही घटना सांगितली. तोपर्यंत चोरट्याने पोबारा केला. रामभाऊ यांच्या गळ्यातील तीन तोळ्याची चैन चोरट्यांनी लंपास केली. तर कपाटातील अंदाजे पावणेदोन लाख रुपये रोकड रक्कम पळवली.

याच रात्री दोन वाजण्याच्या सुमारास महामार्ग नजीक असणाऱ्या सेवानिवृत्त प्राचार्य उत्तम नामदेव सावंत यांच्या घरीही चोरी झाली. यावेळी चोरट्याने दरवाजातून आत प्रवेश केला. अलका सावंत यांना सतुरीचा धाक दाखवून गळ्यातील दीड तोळ्याचे गंठण काढून घेतले. कपाटातील साडेचार लाख रुपये किमतीचे गंठण असेच कर्णफुले तसेच अंदाजे 55 हजार रुपये चोरट्यांनी पळवले. यावेळी चोरट्यांनी सर्व बाहेरील कड्या लावल्या आणि पळ काढला.

हेही वाचा 

Back to top button