सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी सोलापुरात काढलेल्या मोर्चातील कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला होता. या प्रकरणी पोलिस अधिकारी, कर्मचार्यांची योग्य चौकशी करून त्यात ते दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन गुरुवारी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिले.
सोलापूर शहर मध्यचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सभागृहात लक्षवेधी उपस्थित करत संबंधित पोलिस अधिकार्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनेक कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. ताब्यात घेतलेल्यांना फौजदार पोलिस चौकीत आणण्यात आले होते. त्या ठिकाणी पोलिसांनी लाठीमार केला. राजकुमार पाटील या कार्यकर्त्याला मारहाण करण्याचा प्रकारही पोलिसांकडून झाल्याचा आरोप आमदार देशमुख यांनी विधानसभेत केला. पोलिस निरीक्षक विकास देशमुख यांनी त्यांना मारहाण केल्याची तक्रारही करण्यात आली. त्यामुळे त्यांची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी देशमुख यांनी लावून धरली होती.
माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी बेदाणा उत्पादक शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी बेदाण्यावरील जीएसटी शेतकर्यांकडून न घेता व्यापार्यांकडून वसूल करावा, अशी मागणी विधिमंडळाच्या अधिवेशनात लावून धरली. सोलापूर जिल्ह्यासह राज्यात बेदाणा उत्पादक शेतकर्यांची संख्या मोठी आहे. मात्र बेदाणा उत्पादक शेतकर्यांना योग्य भाव मिळत नाही. त्यातच शेतकर्यांकडून जीएसटी वसूल केला जातो. त्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. जीएसटी शेतकर्यांकडून न घेता व्यापार्यांकडून घ्यावा, असे आ. शिंदे म्हणाले. तसेच शालेय पोषण आहारामध्ये बेदाणा शालेय विद्यार्थ्यांना द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. त्यामुळे शेतकर्यांना अधिकचा भाव मिळेल आणि बेदाण्याला मार्के ट मिळेल, असे त्यांनी सांगितले. त्यावर मंत्री संदीपान भुमरे यांनी बेदाण्याचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले. त्याची अंमलबजावणी लवकरच होईल, अशी खात्री देत शेतकर्यांना न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल, असे स्पष्ट केले.