ग्लोबल विद्यार्थी घडविण्याचे ‘पुढारी’चे कार्य कौतुकास्पद : रणजित डिसले | पुढारी

ग्लोबल विद्यार्थी घडविण्याचे ‘पुढारी’चे कार्य कौतुकास्पद : रणजित डिसले

पंढरपूर, पुढारी वृत्तसेवा : बदलत्या जगाला सामोरे जाताना आजच्या विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान घेऊन उपयोग नाही, तर ते खर्‍या अर्थाने ग्लोबल झाले पाहिजेत. त्याद़ृष्टीने दैनिक ‘पुढारी’ सुरू करत असलेली ‘पुढारी टॅलेंट सर्च’ परीक्षा (पीटीएसई) खूपच उपयुक्त ठरेल, असा विश्वास ग्लोबल टीचर पुरस्कारप्राप्त रणजित डिसले यांनी व्यक्त केला.

दैनिक ‘पुढारी’ आयोजित ‘पुढारी टॅलेंट सर्च’ एक्झामिनेशनसाठी सुरू करण्यात आलेल्या विद्यार्थी संपर्क अभियानाची सुरुवात डिसले गुरुजी यांच्या हस्ते परीक्षेचे माहितीपत्रक श्री विठ्ठलाच्या चरणी ठेवून मंगळवारी करण्यात आली. त्याप्रसंगी डिसले बोलत होते. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज-जळगावकर उपस्थित होते.

डिसले म्हणाले, केवळ बातम्या देणे एवढेच माध्यमांचे मर्यादित कार्य नाही तर सामाजिक बांधिलकी जोपासताना आजचा विद्यार्थी उद्याचा सर्वगुणसंपन्न नागरिक बनविणे हीसुद्धा माध्यमांची जबाबदारी आहे.

दै. ‘पुढारी’तर्फे घेतली जाणारी ‘पुढारी टॅलेंट सर्च’ परीक्षा हा माध्यमांमधील एक पथदर्शी उपक्रम ठरेल. यातून अनेक बुद्धिवंत विद्यार्थी घडतील, असा आशावादही डिसले यांनी व्यक्त केला.

पुढारी टॅलेंट सर्च एक्झामिनेशन या परीक्षेतून भविष्यातील स्पर्धा परीक्षांचा पाया भक्कम होण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांमधील टॅलेंट शोधण्याचे काम ‘पुढारी’ करत आहे. ‘पुढारी’ नुसतेच टॅलेंट शोधत नाही, तर त्या टॅलेंटचा पारितोषिक देऊन सन्मान करत आहे. यातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘पुढारी टॅलेंट सर्च’ या परीक्षेकडे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी केवळ एक परीक्षा म्हणून न बघता ती आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाची एक चालून आलेली संधी आहे, याद़ृष्टीने त्याकडे पाहून जास्तीत जास्त जणांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन डिसले यांनी केले.
‘पुढारी टॅलेंट सर्च’ एक्झामिनेशन या परीक्षेतून जिल्हा व तालुका स्तरावर इयत्ता तिसरी ते इयत्ता आठवी मधील प्रत्येकी तीन क्रमांक काढण्यात येणार आहेत. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचा नावलौकीक वाढणार असून इतर विद्यार्थ्यांना यातून प्रेरणा मिळण्यास मदत होणार असल्याचेही डिसले यांनी सांगितले.

यावेळी दैनिक ‘पुढारी’चे विभागीय कार्यालयप्रमुख सिद्धार्थ ढवळे, वितरण व्यवस्थापक अशोक पाटील, जाहिरात प्रतिनिधी सतीश यादव, सुरेश गायकवाड, सागर कारंडे, अतुल ढवळे उपस्थित होते.

Back to top button