सोलापूर : ऑफलाईन सभेसाठी अध्यक्षांसह सदस्यांचा जि.प.च्या दारात ठिय्या | पुढारी

सोलापूर : ऑफलाईन सभेसाठी अध्यक्षांसह सदस्यांचा जि.प.च्या दारात ठिय्या

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सभागृहात घेण्यासाठी अध्यक्षांसह सर्वपक्षीय सदस्यांनी सोमवारी (दि. 12) रुद्रावतार धारण केला. थेट सभा तहकूब करून त्यांनी जिल्हा परिषदेच्या दारातच कट्ट्यावर ठिय्या मारला. संसदीय अधिवेशन होते, विधिमंडळ अधिवेशन होते, मग जिल्हा परिषदेच्या थेट सर्वसाधारण सभेलाच विरोध का, असा जाब विचारला.

यावेळी शासनाच्या आणि प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला; पण त्यांनाही खडे बोल सुनावण्यात आले. शेवटी स्वामी यांनी राज्य शासनाशी समन्वयाने तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यानुसार तहकूब केलेली सभा पुन्हा 22 रोजी रोजी होणार आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी ऑनलाईन प्रणालीने सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र ऑनलाईन सभेस सर्वपक्षीय सदस्यांनी तीव्र विरोध केला होता.

त्यासाठी नियोजन समितीच्या सभागृहात बैठक घेण्याचीही मागणी केली होती. पण त्याला परवानगी देण्यात आली नाही. शेवटी ऑनलाईन सभेवरच शिक्कामोर्तब झाला होता. त्यानुसार आज सभा होती. पण सदस्यांसह अध्यक्षांनी थेट सभा तहकुबीचा निर्णय घेतला. त्यांनी राज्य शासनाविरोधात जिल्हा परिषदेत ठिय्या मारला.

यावेळी कांबळे म्हणाले, संसदेचे, विधानसभेचे अधिवेशन सभागृहात होते, मोठमोठ्या सभा होतात, पालकमंत्र्यांची सभाही घेण्यात येते, नियोजन समितीचीही सभा सभागृहात होते, मग जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेसच विरोध का करण्यात येत आहे? यामध्ये अधिकार्‍यांचा गैरप्रकार समोर येऊ नये म्हणूनच प्रशासन थेट सभा टाळून ऑनलाईनची पळवाट काढत आहे.

ऑनलाईन सभेत अधिकार्‍यांना जाब विचारता येत नाही. त्यामुळे सदस्यांनी ऑफलाईन सभेला परवानगी मिळालीच पाहिजे, अशी घोषणाबाजी केली.

यादरम्यान दिलीप स्वामी आंदोलनस्थळी आले. त्यांनाही याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याची सूचनाही करण्यात आली. त्यांनी चर्चा करून निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले. त्यामुळे सदस्यांचा पारा खाली आला.

यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य प्रा. सुभाष माने, आनंद तानवडे, त्रिभुवन धाईंजे, मदन दराडे, भारतआबा शिंदे, अ‍ॅड.सचिन देशमुख, विरोधी पक्षनेता बळीरामकाका साठे, पक्षनेता अण्णाराव बाराचारी, सदस्या शैला गोडसे, रजनी देशमुख, बाळासाहेब देशमुख आदी सदस्य उपस्थित होते. या आंदोलनानंतर सर्वच सदस्यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांचे दालन गाठले.

सीईओंचा निषेध, अध्यक्षांची सारवासारव…

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सभागृहातच घेण्यात यावी या मागणीसाठी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्यासह अन्य सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या दारात ठिय्या आंदोलन केले. यावेळी एका सदस्याने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचा निषेध व्यक्‍त केला.

ठिय्या आंदोलन झाल्यानंतर मात्र जि.प. अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी सीईओंचा निषेध करण्यात आला नाही. एखादा सदस्य असतो, मात्र तसे काही नाही, असे स्पष्ट करत सारवासारव निषेध विषयावर केली.

Back to top button