सोलापूर : गांजाची ६० झाडे जप्‍त | पुढारी

सोलापूर : गांजाची ६० झाडे जप्‍त

मोहोळ; पुढारी वृत्तसेवा : अनगर (ता. मोहोळ) येथे शेतामध्ये गांजा ची लागवड करून विक्री करणार्‍या शेतकर्‍यावर मोहोळ पोलिसांनी सोमवारी (दि. 12) छापा टाकून कारवाई केली. कारवाईदरम्यान पोलिसांनी तब्बल 60 गांजाची झाडे हस्तगत केली. याप्रकरणी हनुमंत धर्मा शिंदे (रा. अनगर, ता. मोहोळ) याला पोलिसांनी अटक केले. बाजारात याची किंमत अंदाजे चार ते पाच लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोहोळ पोलिसांचे गुन्हे प्रकटीकरण पथक सोमवारी अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करीत होते. त्यांना अनगर गावच्या शिवारात एका शेतकर्‍याने लागवड करून तो गांजा विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मळाली होती. त्यानुसार मोहोळ पोलिस पथकाने अनगर येथील रेल्वे रुळालगत असणार्‍या हनुमंत शिंदे यांच्या शेतात सोमवारी सायंकाळी अचानक छापा टाकला. तेथे त्यांना अंदाजे 6 फूट उंचीची तब्बल 60 गांजाची झाडे मिळून आली.

यावेळी पोलिस पथकाने या गांजा लागवडीबाबत हनुमंत शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिस पथकाने त्याला ताब्यात घेतले तसेच गांजाची झाडे जप्त केली आहेत. या गांजाची किंमत अंदाजे चार ते पाच लाख रुपयांंपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.

मोहोळ चे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, सहाय्यक फौजदार कदम, युसुफ शेख, पोलीस कॉन्स्टेबल गणेश दळवी पांडुरंग जगताप मंगेश बोधले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Back to top button