सोलापूर : शहरातील रस्ते चकाचक, मात्र ग्रामीण भाग खड्डेमयच | पुढारी

सोलापूर : शहरातील रस्ते चकाचक, मात्र ग्रामीण भाग खड्डेमयच

सिध्दार्थ ढवळे

पंढरपूर शहरात आषाढी यात्रेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्त्यांच्या कामासाठी 10 कोटी रुपये मंजूर केले आणि शहरातील रस्ते चकाचक झाले आहेत; मात्र ग्रामीण भागातील रस्तेदेखील खड्डेमुक्त करुन वाहनधारक, प्रवाशांची सोय करावी.

पंढरपूर तीर्थक्षेत्र असल्याने येथे वेगाने विकासाची कामे होत आहेत; मात्र ग्रामीण भागाकडे मात्र सरकारचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. पावसाने हुलकावणी देऊन दीड महिना उलटून गेला आहे. शेतकर्‍यांसह सर्वसामान्य नागरिकही चिंताग्रस्त झाले आहेत. अशातच गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांत पाणी साचून राहिले आहे, तर अनेक रस्त्यांवर चिखल तयार झाला आहे. यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था बिकट झालेली आहे. अनेक वाहनांचे अपघात घडत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे त्वरित करणे गरजेचे आहे.

पंढरपूर शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांत पावसाचे पाणी साचून राहत असल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. त्यामुळे दुचाकींचे अपघात घडत आहेत. हे अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होते. स्थानिक आमदार व खासदार यांच्या माध्यमातून तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची कामे मंजूर आहेत, मात्र मंजूर कामाला निधी मिळूनही ठेकेदार वेळेत कामे पूर्ण करत नाहीत. त्यामुळे खड्डेमय असलेले रस्ते अधिकच खड्डेमय होताना दिसत आहेत. ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम नुकताच राबविण्यात आला. यावेळीदेखील गावोगावी नागरिकांनी रस्त्यांच्या तक्रारी मांडलेल्या आहेत. यावर आमदारांनी मंजूर रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिलेल्या आहेत. मात्र असे असतानादेखील अधिकारी व ठेकेदार यांच्याकडून चालढकल करण्यात येत आहे.

कामे केली तर निकृष्ट दर्जाची होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. सध्या पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर प्रशासक काम पाहत आहेत. त्यामुळे प्रशासकांकडून कामांच्या दर्जाकडे लक्ष दिले जात नाही. तसेच कामांची अंमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे सुरू असलेला पावसाळा वाहनधारक, प्रवासी यांना खड्डेमय रस्त्यावरुनच पार पाडवा लावणार आहे, हे मात्र निश्चित!

Back to top button