सोलापूर : पाणी साठवण क्षमता वाढणार; 19 गावांचा समावेश

सोलापूर; अमोल साळुंके : जिल्हा परिषदेतील जलसंधारण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील एकोणीस गावांत पाझर तलाव, कोल्हापूर पध्दतीचे पाटबंधारे दुरुस्तीची 20 जलसंधारणाची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या गावांत 372 सहस्र घनमीटर इतकी साठवण क्षमता वाढणार आहे.
मागील वर्षी क्षमतेपेक्षा जास्त पाऊस पडला होता. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक पाझर तलाव, पाटबंधारे, कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्यांची पडझड झाली होती. त्या बंधार्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्याने पाणी साठवण क्षमता कमी झाली होती. त्यामुळे जलसंधारण विभागाने जिल्ह्यातील अनेक बंधार्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. त्यामधील 20 बंधार्यांची कामे पूर्ण झाली आहेत.
जिल्ह्यातील अक्कलकोट, माळशिरस, सांगोला, बार्शी, माढा, पंढरपूर, करमाळा या तालुक्यांतील गावांमध्ये कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, पाझर तलाव, सिमेंट बंधारे दुरुस्ती, नवीन सिमेंट बंधारे बांधणे आदी कामे पूर्ण झाली आहेत. तसेच काही तालुक्यांतील गावात जलसंधारणाची कामे वेगाने सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील पाणी साठवण क्षमता वाढणार आहे.
दुरुस्ती करण्यात आलेले बंधारे
कोल्हापूर पध्दतीचेे बंधारे – 5, गाव तलाव दुरुस्ती – 1, पाझर तलाव दुरुस्ती-8, सिमेंट बंधारा दुरुस्ती – 5, नवीन सिमेंट बंधारा बांधणे -01.
जलसंधारण विभागाची जिल्ह्यात 19 कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. यामुळे पाणी साठवण क्षमता वाढणार आहे. संथगतीच्या कामांना वेग देण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती जि.प.चे अतिरिक्त सीईओ संदीप कोहिनकर यांनी दिली.
या गावांत कामे झाली पूर्ण
लोणारवाडी, अंजनडोह, चौभेपिंपरी, वरवडे, कारुंडे, शिवणे, संगमनेर, घेरडी, पांगरी, नन्हेगाव, दहिटणे, उडगी, आलेगाव, चांडोलेवाडी, सांगोला, ग्रा., किडबिसरी, चांदापुरी, महुद, चिंचोली या गावांत जलसंधारणाची कामे पूर्ण झाली आहेत.