सोलापूर : ‘प्रोत्साहन’ योजनेचा निर्णय अधांतरी | पुढारी

सोलापूर : ‘प्रोत्साहन’ योजनेचा निर्णय अधांतरी

सोलापूर; संदीप गायकवाड :  जिल्ह्यात नियमित परतफेड करणार्‍या 31 हजारांहून जास्त शेतकर्‍यांचा प्रोत्साहन निधीचा प्रश्न अधांतरित आहे. ठाकरे सरकारने ‘महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती’ योजना राबवली होती. यामध्ये नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर म्हणून देण्यात येणार होते. मात्र, जिल्ह्यातील निम्म्या शेतकर्‍यांची प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातील शेतकर्‍यांसाठी ‘महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती’ योजना लागू केली होती. या योजनेमध्ये थकबाकीदार शेतकर्‍यांची पीक कर्जे माफ करण्यात आली होती. या योजनेंतर्गत नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपये लाभ म्हणून देण्यात येणार आहेत. मात्र, अद्याप या लाभापासून जिल्ह्यातील निम्मे शेतकरी वंचित असल्याचे समोर येत आहे. थकबाकीदार शेतकर्‍यांना लाभ मिळाला; मात्र प्रामाणिकपणे बँकेच्या कर्जाची परतफेड करणारे शेतकरी या योजनेपासून वंचित राहिल्यामुळे शेतकर्‍यांमधून रोष व्यक्त केला जात आहे.

योजनेची स्थिती

शासनाकडे नोंदणी केलेली कर्ज खाती- 71109
विशिष्ट क्रमांकासह मंजूर केलेली खाती- 39511
यापैकी आधार प्रमाणीकरण झालेली खाती- 38969
रक्कम वितरित झालेली खाती- 36997
आतापर्यंत दिलेला लाभ – 165.92 कोटी रुपये

जिल्हा बँकेचे सर्वाधिक लाभार्थी

शासनाकडे बँकांनी नोंदणी केलेल्या नियमित परतफेड करणार्‍या 71 हजार 109 पैकी 31 हजार 598 शेतकर्‍यांबाबत अद्याप निर्णय प्रलंबित ठेवला आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 13 हजार 884, तर इतर बँकांच्या 18 हजार 256 शेतकर्‍यांचा समावेश आहे.

आम्ही नेहमी मुदतपूर्व कर्जफेड केली. शासनाने आम्हाला 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली. मात्र दोन वर्षे उलटली तरी अद्याप हे पैसे मिळाले नाहीत.
– महेश क्षीरसागर
शेतकरी, अकोलेकाटी, ता. उत्तर सोलापूर

Back to top button