सोलापूर : आषाढी वारीतून एस.टी.ला 50 कोटींचे उत्पन्न | पुढारी

सोलापूर : आषाढी वारीतून एस.टी.ला 50 कोटींचे उत्पन्न

सोलापूर; अंबादास पोळ :  आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी एस.टी.ने पंढरपुरात दाखल झाले होते. वारकर्‍यांच्या सेवेसाठी एस.टी. महामंडळातर्फे 25 जून ते 05 जुलैदरम्यान सुमारे 5 हजार विशेष बसेस सोडण्यात आल्या होत्या. यातून 50 कोटी 49 लाख 24 हजार रुपये उत्पन्न महामंडळाला मिळाले आहे.

मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा विभागांतून गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. या जादा बसगाड्यांमधून 16 लाख 73 हजार 13 प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून 50 कोटी 49 लाख 24 हजार रुपये उत्पन्न महामंडळाला मिळाले आहे.
राज्य सरकारकडून यंदा आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकर्‍यांसाठी ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी वारकरी विमा छत्र’ योजनेंतर्गत 5 लाखांचा विमा देण्यात आला होता. विठ्ठलाच्या ओढीसाठी लाखो वारकरी विविध भागांतून पालख्या घेऊन पंढरपुरात दाखल झाले होते. आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये वैष्णवांचा मेळा भरला होता. या यात्रेसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. दरम्यान, यात्रा काळात पंढरपूर परिसरात पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय अशा विविध सोयीसुविधा पुरविण्यात आल्या होत्या. पंढरपुरात येणार्‍या वारकर्‍यांसाठी एस. टी. महामंडळाने विशेष गाड्या सोडल्या होत्या. वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. औरंगाबाद विभागातून 1 हजार 250, मुंबई 540, नागपूर 110, पुणे 1 हजार 250, नाशिक 1 हजार 100 आणि अमरावती येथून 750, अशा प्रकारे यात्रेसाठी विशेष बसेस सोडण्यात आल्या होत्या.

आषाढी वारीसाठी एस.टी.चे नियोजन

पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात आल्या होत्या. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी यात्रेच्या कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रास्थानक अशी चार तात्पुरती बसस्थानके उभारण्यात आली होती.

‘महिला सन्मान’, ‘अमृत’ योजनेंतर्गत सवलत

पंढरीच्या भाविकांसाठी यंदा एस.टी. महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना ‘अमृत’ योजनेंतर्गत मोफत प्रवासाची सवलत दिली होती. याशिवाय महिलांना 50 टक्के प्रवास भाडे सवलत देण्यात आली होती. एस.टी.तून राज्यात कमी पैशात प्रवास करण्याची योजनासुद्धा होती. या योजनेंतर्गत अनेकांनी एस.टी.तून प्रवास केला आहे.

Back to top button